| जळगाव | वृत्तसंस्था |
एकनाथ खडसे लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली होती. आता यावर शरद पवार यांनी भाष्य केले असून एकनाथ खडसे यांच्यावर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार हे जळगाव दौर्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशासंदर्भात भाष्य केले. एखाद्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करण्याची भूमिका याआधी महाराष्ट्रात कधीही नव्हती. मात्र, ती आता सुरु झाली आहे. त्यामधून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. कदाचित ही अवस्था एकनाथ खडसे यांच्यावरदेखील आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर नाईलाजाने काही निर्णय घेण्याची वेळ आली असावी, असा माझा समज आहे. एकनाथ खडसे यांच्यावर तपास यंत्रणांचा दबाव आहे, असे शरद पवार म्हणाले.