वाहनचालकांच्या बेदरकारपणामुऴे अपघात वाढले; परिवहन विभागाची रंगीत तालीम दाखावाच
| खोपोली | संतोषी म्हात्रे |
मुंबई-पुणे महामार्गावर दिवंसेदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून, या मार्गावरुन प्रवास करणार्या वाहनचालकांचाच बेदरकारपणा अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
दोनच दिवसांपूर्वी चेंबूर येथील एका खाजगी कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांच्या सहलीला अपघात होऊन दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. या अपघाताची कारणे शोधताना वाहतूक पोलीस अधिक्षक तानाजी चिखले यांना वाहनचालकाच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून आले. तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी, मंडळ अधिकारी सचिन वाघ तलाठी रंजीत कवडे यांनी जातीने लक्ष दिले.
परिवहनचा दिखावा
1 डिसेंबर पासून परिवहन खात्याच्या अधिकार्यांनी पनवेल ते बोरघाट अमृतांजन ब्रीज अशा जुन्या व द्रुतगती महामार्गावरील 40 किमी अंतराच्या मार्गावर 24 तास गस्त घालण्याची रंगीत तालीम केली. मोठा गाजावाजा करून वाहनचालकांना शिस्तीचे धडे दवंडी पिटून दिले. हा खेळ फक्त 2 दिवस चालला आणि शासनाचा कारभार पुन्हा शांत झाला. याच काळावधीत किमान 7 अपघात या दोनही मार्गावर घडून पाचजण ठार तर 6 जखमी झाले. ही मोहीम फक्त दिखावा ठरल्याने वाहन चालक व अपघातात जीव गमावलेल्यांचे कुटुंब विभागीय परीवहन खात्याच्या नावाने शिव्या वाहत आहेत.
बोरघाटात दुर्घटना वाढल्या
बोरघाट उतरताना मागील एका महिन्यात 3 बसला व ट्रक, रिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांना अपघात झाला असून आळंदीवरुन परतणार्या भाविकांच्या बसच्या अपघातात 15 वारकरी जखमी झाले होते. अशा 5 घटनांमध्ये 21 जण जखमी झाले होते. 4 वर्षापूर्वी बोरघाटातून खाजगी प्रवासी वाहतूक करणार्या बसला जुन्या महामार्गावरील गारमाळ रस्ता जवळ बस पलटी होऊन 8 प्रवासी ठार झाले होते. यावेळी हा मार्गावर एकेरी वाहतूक करीत नो एंट्री करण्यात आली होती. मात्र हाही प्रयोग भुलभुलय्या ठरला असल्याने रविवारी रात्री 8 वा घडलेली घटना प्रशासनाचा निष्काळजीपणा तून समोर आलेले वास्तव सत्य आहे
मागील एका महिन्यात बोरघाटात 14 अपघातात 13 जण ठार तर 12 जखमी, तर 21 वाहनांचे नुकसान झाले आहे. इर्टीका कार अपघातात 7 ठार तर 2 जखमी, क्वालिस अपघातात विजय पाटील कांजूरमार्ग हे ठार झाले, तर त्यांचे कुटुंबिय जखमी झाले होते.
महामार्गावरील अपघातांची मालिका
सन 2018 – 359 अपघातात 114 बळी
सन 2019 – 353 अपघातात 92 बळी
सन 2020 कोवीड -169 अपघातात 66 बळी
सन 2021 – 206 अपघातात 88 बळी
सन 2022 – 168 अपघातात 68 बळी
बळींची संख्या अवघ्या 10 महीन्यात जानेवारी ते ऑक्टोबर या महिन्यात झाले असल्याने बोरघाट प्रवास म्हणजे जीवावरचा खेळ झाला आहे.