। मुंबई । प्रतिनिधी ।
मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. अशातच वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना गिरगावात घडली आहे. वडिलांनीच आपल्या स्वत:च्या पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
18 वर्षीय तरुणी, तिची लहान बहीण आणि आई-वडील असे चार लोक गिरगावात राहत होते. काही महिन्यांपूर्वी मोठ्या मुलीवर एका व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तिला अनाथालयात पाठवण्यात आले. अनाथालयात असलेल्या मुलीला तिची आई भेटण्यासाठी गेली असता वडील लहान मुलीवर अत्याचार करत असल्याचे आईने मोठ्या मुलीला सांगितले. त्यांनतर मोठ्या मुलीने तिच्यासोबत वडिलांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतही सांगितले. मोठ्या मुलीसोबत घडलेल्या घटनेची तिच्या आईला कोणतीही कल्पना नव्हती. मोठी मुलगी घरातून अनाथालयात गेल्यानंतर तिच्या वडिलांनी लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. वडिलांकडून होत असलेल्या अत्याचारानंतर लहान मुलगी आणि तिची आई घरातून पळून गेले.
मोठी मुलगी 5 वर्षांची असल्यापासून तिच्यावर स्वत:च्या वडिलांकडून अत्याचार होत होता. तिने याबाबत कुठेही सांगितल्यास तिला मारुन टाकण्यात येईल अशी धमकीही वडिलांनी दिली होती. त्यामुळे मुलीने याबाबत कुठेही काहीही वाच्यता केली नाही. मात्र, लहान बहिणीवरही अत्याचार होत असल्याने अखेर तिने बालकल्याण समितीकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली असता पोलिसांनी वडिलांना अटक केली.