सरासरीच्या 105 टक्के पाऊसमान; हवामान विभागाचा पहिला अंदाज
| पुणे | प्रतिनिधी |
देशातील शेतकर्यांसाठी चांगली बातमी असून, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने देशात सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हवामान विभागाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आगामी मान्सूनचा अंदाज व्यक्त केला. जून ते सप्टेंबर 2025 या काळातला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला आहे. मराठवाड्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊसकाळ असेल तर मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यासह कोकण आणि विदर्भातही पावसाच्या सरी सरासरी ओलांडतील, असा अंदाज आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंज मोहपात्रा आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी सांगितलं की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्येच यंदा मान्सूनला पोषक परिस्थिती असेल. सरासरीच्या तुलनेमध्ये 2025 मध्ये 105 टक्के पाऊस कोसळेल. हिंदी महासागरातील स्थिती एलनिनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरु शकते. त्यामुळं मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो, असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. एलनिनो दक्षिणी दोलन प्रभावी नसणं त्याचवेळी आयओडी सकारात्मक असल्यानं चांगला पाऊस येऊ शकतो. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्या टप्प्यात चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
एलनिनोशिवाय इतर घटकदेखील मान्सूनवर परिणाम करत असतात. आयओडी (इंडियन ओसियन डायपोल) सध्या प्रभावहीन असून यामुळं मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे. एलनिनो दक्षिणी दोलन आणि आयओडी दोन्ही मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करतात. चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो.
अशी काढली जाते पावसाची टक्केवारी
हवामान विभागाने पावसाच्या प्रमाणाच्या अशा पाच श्रेणी ठरवल्या आहेत. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस - अपुरा पाऊस, 90 ते 95 टक्के - सरासरीपेक्षा कमी पाऊस, 96 ते 104 टक्के - सरासरीइतका पाऊस, 105 ते 110 टक्के - सरासरीपेक्षा जास्त पाऊस, 110 टक्क्यांपेक्षा जास्त - सर्वाधिक पाऊस
मान्सून 1 जूनला केरळमध्ये
सर्वसाधारपणे 1 जून रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर सात ते आठ दिवसात मान्सून मुंबईच्या किनार्यावर धडकतो. यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एल निनो प्रभावहिन
स्कायमेटनेही याआधी मान्सूनबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यामध्ये म्हटलंय की, ला निना या हंगामात कमकुवत आणि संक्षिप्त असेल. ला निनाचे चिन्ह आता धुसर होत आहे. मान्सूनवर विपरीत परिणाम करण्यार्या एलनिनोची शक्यता नाकारण्यात आली आहे. एलनिनो दक्षिणी दोलन फार न्यू्ट्रल राहणार असल्यानं भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे. ला निना कमकुवत असणं आणि एलनिनो प्रभावी नसल्यानं मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो.