| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेकाप महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया आघाडीच्या अध्यक्षा तसेच प्रवक्त्या म्हणून निवड करण्यात आली आहे. शेकापच्या मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली असून, नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले आहे.
चित्रलेखा पाटील या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘मुली शिकल्या पाहिजे’ हा ध्यास घेत त्यांनी सामाजिक बांधिलकीतून तसेच त्यांच्या प्रयत्नातून हजारो मुलींना सायकली दिल्या आहेत. शिक्षण घेऊन नोकरी नसलेल्या तरुण-तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करून रोजगाराचे दालन खुले करून दिले आहे. विचारांची देवाण-घेवाण व्हावी, यासाठी खास महिलांसाठी कृषीवल हळदीकुंकूसारखे उपक्रम राबविले आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. महिलांसह अन्यायग्रस्तांच्या प्रश्नांसाठी लढा देणाऱ्या नेत्या म्हणून जनमानसात त्यांनी अगदी कमी कालावधीत ओळख निर्माण केली आहे. शेकाप महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया आघाडीच्या अध्यक्षा तसेच प्रवक्त्या म्हणून चित्रलेखा पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. शिक्षण आणि राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा पक्षाच्या वाढीसाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.