। पेण । वार्ताहर ।
टी.बी.एम स्पोर्ट कारावी व रायगड जिल्हा असोशियनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जय बजरंग बेली अलिबाग या संघाने अंतिम विजेतेपद पटकावले आहे. राष्ट्रीय खेळाडू प्रशांत मोकल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय कबड्डीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आमंत्रित 16 संघाने भाग घेतला होता. ही स्पर्धा पेण तालुका क्रिडा संकुलाच्या भव्य मैदानावर घेण्यात आली.
अंतिम चार संघामध्ये जय बजरंग बेली, वायुसुत ओढांगी, झुंझार कणे, जय हनुमान चरी या चार संघाने मजल मारली होती. पहिली सेमी फायनल वायुसुत ओढांगी आणि जय हनुमान चरी यांच्या मध्ये झाली. तर दुसरी सेमी फायनल जय बजरंग बेली व झुंझार कणे यांच्या मध्ये झाली. अंतिम सामना जय बजरंग बेली व वायुसुत ओढांगी मध्ये झाला. मध्यंतरापर्यंत वायुसुत ओढांगीची सामन्यावर चांगली पकड होती, परंतु मध्यंतरानंतर जय बजरंग बेलीने सावध पवित्रा घेत मध्यंतरापर्यंची दोन गुणांची पिछाडी भरून काढुन शेवटी सहा गुणांनी जय बजरंग बेली हा अंतिम विजेता झाला. या स्पर्धेतील उत्कृष्ट पकड सुपे्रश म्हात्रे (कणे), उत्कृष्ट चढाई जितेश पाटील (ओढांगी), चरी संघाचा पब्लिक हिरो बिपीन थळे तर सर्वोकृष्ट खेळाडू स्वप्नील वेले (बेली) यांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी सामाजिक, राजकीय, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.