। रत्नागिरी । वृत्तसंस्था।
मालवणची सुकन्या जान्हवी देवधर हिने भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सर्वात तरुण महिला स्कूबा डायव्हिंग कोर्स संचालक बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मानांकित आणि स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षकांची व्यावसायिक संघटना असलेल्या पेंडी या संस्थेत कोर्स डायरेक्टर होण्याचा जान्हवीचा प्रवास वयाच्या 16 व्या वर्षी तिचे मूळ गाव असलेल्या मालवण येथून सुरू झाला. तिची जिज्ञासा आणि समुद्रात खोलवर जाण्याच्या इच्छेमुळे, तिने तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड क्वाटीक स्पोर्ट्स (इसदा) मधून स्कुबा डायव्हिंग प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी कठोर प्रशिक्षण सुरू केले. जान्हवीने वयाच्या 20 व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण पँडी महिला विशेष प्रशिक्षकांपैकी एक म्हणून पहिला टप्पा गाठला. पुढील प्रशिक्षण तिने दुबईमधून पूर्ण केले. आज जान्हवी सर्वात तरुण आणि पहिली महिला भारतीय पेंडी कोर्स डायरेक्टर म्हणून ओळखली जात आहे. स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण आणि इतर व्यक्तींना प्रमाणित करण्यासाठी ती आता खंबीरपणे तयार आहे. स्कुबा डायव्हिंगच्या क्षेत्रात महिलांचे कमी प्रतिनिधित्व पाहता जान्हवीचे हे यश विशेष लक्षणीय आहे. तीच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य मुलींनी या क्षेत्रात येणे गरजेचे आहे.