लोकशाहीच्या रक्षणासाठी गद्दारांना गाडा : जयंत पाटील

सुरेंद्र म्हात्रेंना विक्रमी मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन

| चौल | प्रतिनिधी |

जे गद्दार आहेत, ते बाहेरचे नाहीत. आपल्यातीलच आहेत. लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर या गद्दारांना हद्दपार करावेच लागेल, असा थेट इशारा देत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी चौल जिल्हा परिषद मतदारसंघातून राजकीय रणशिंग फुंकले. शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीची जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पहिली सभा रविवारी (दि.18) चौल-तुलाडदेवी येथे पार पडली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. सुरेंद्र म्हात्रे हे फक्त शिवसेनेचे उमेदवार नाहीत. ते शेतकरी कामगार पक्षाचे आणि काँग्रेसचेही उमेदवार आहेत. प्रत्येकाने तसेच समजून काम करावे. त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच चौल मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून, महाविकास आघाडीविरोधात काम करणाऱ्या गद्दारांवर जयंत पाटील यांनी उघड हल्लाबोल केला. “जे गद्दार आहेत, ते बाहेरचे नाहीत, आपल्यातीलच आहेत. आम्हालाही कळले नाही की कोण कधी बाजू बदलून बसला,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सावध केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी घेतलेल्या सर्वपक्षीय आढावा बैठकीने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले. या बैठकीला जनतेची तोबा गर्दी पाहायला मिळाली. या बैठकीस शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष तथा चौल जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे, विजय चौलकर, चौलचे माजी सरपंच मधुकर फुंडे, शेकापचे ज्येष्ठ नेते सुरेश खोत, निलेश खोत, शरयू स्वप्नील अधिकारी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, आशिष गोंधळी, महेंद्र पाटील, शिवसेनेचे अशोक नाईक, विनायक म्हात्रे, सूरज म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, चौल विभागात आपल्याला मते वाढवायची आहेत. आपली महाविकास आघाडी शेवटपर्यंत टिकवायची आहे. पण, यामध्ये मिठाचा खडा टाकणारे कोण आहेत, हे शोधण्याची जबाबदारी आमची आणि तुम्हा कार्यकर्त्यांचीही आहे. अलिबाग तालुक्यातील आमदारांच्या कामगिरीवर टीका करत जयंत पाटील म्हणाले की, पूर्वी अलिबागचे आमदार विधिमंडळात ठामपणे बोलायचे. नाना कुंटे, दत्ता पाटील, ना.का. भगत, मधुकर ठाकूर यांनी तालुक्याचे नाव उंचावले. आजचा आमदार कधी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना दिसतो का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मी एकटा आमदार असतानाही अलिबागचे नाव आणि काम विधिमंडळात कधीही खाली जाऊ दिले नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

चौल आणि परिसरातील विकासकामांचा उल्लेख करताना जयंत पाटील म्हणाले की, चौलमधील अनेक रस्ते आणि गल्ल्या सिमेंट काँक्रिटच्या करण्यात आल्या आहेत. नागावपर्यंत पाणी पोहोचवण्यात आले असून, शास्त्रीनगरला मोठी पाण्याची टाकी बांधून चौलला पाणी आणण्याचा निर्धार आहे. रेवदंड्यातही आपल्याला पाणी पोहोचवायचे आहे. ग्रामपंचायत स्तरावरही ही आघाडी टिकली पाहिजे, नाही तर नको तेच लोक सत्तेत येतील, असा इशाराही त्यांनी दिला. जर आपण घडवलेले लोक आज आपल्या विरोधात काम करत असतील, तर त्याचा बदला आपल्याला मतपेटीतून घ्यायचा आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी प्रत्येक गावातील प्रत्येक बूथवर जाऊन काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. शेकापने पनवेल येथे झालेल्या सभेत गद्दारांना ना तिकीट देण्याचा, ना पक्षात स्थान देण्याचा ठराव घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चौलचा खरा सर्वांगीण विकास शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय शक्य नाही. उद्याचा विजय हा सुरेंद्र म्हात्रेंचाच विजय असेल. रायगड जिल्ह्यात सर्वाधिक मते त्यांनाच मिळतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन केले. चौलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीने निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून, जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधकांचे आव्हान अधिकच कठीण झाले आहे.

पैशाचे आमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण : सुरेंद्र म्हात्रे
महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी विरोधकांवर प्रखर शब्दांत हल्लाबोल केला. खोटी आश्वासने देणे, आधीच झालेली कामे नव्या स्वरूपात दाखवून ग्रामस्थांची दिशाभूल करणे, 300 कोटींचा निधी आणल्याचे हवेतले दावे करून जनतेला स्वप्ने दाखवणे, असे प्रकार विरोधक सातत्याने करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पैशांचा महापूर दाखवून फोडाफोडीचे राजकारण, खोटी टेंडरिंग आणि जनतेची फसवणूक सुरू आहे, आणि म्हणूनच ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ही निवडणूक आपल्याला जिंकलीच पाहिजे” या निर्धाराने प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले. कोविडसारखी महाभयंकर महामारी, निसर्ग चक्रीवादळ आणि त्यात चौल परिसराचे 100 टक्के नुकसान झाले असताना, चौलचा बागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. त्या कठीण काळात आमदार आणि अन्य सत्ताधारी कुठे होते? असा थेट सवाल उपस्थित करत, ती वेळ जनता विसरलेली नाही, अशी घणाघाती टीका सुरेंद्र म्हात्रे यांनी केली.
Exit mobile version