स्नेहल जगताप यांचे प्रतिपादन
| पोलादपूर | प्रतिनिधी |
कापडे येथे सीईटी मार्गदर्शन केंद्राला विद्यार्थ्यांच्या प्रतिसादानंतर महाड तालुक्यामध्ये जेइइ आणि नीटचे मार्गदर्शन केंद्र लवकरच सुरू करणार असल्याचे महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी सांगितले. श्री वरदायिनी माध्यमिक विद्यालय कापडे बुद्रुक येथे सीइटी मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन स्नेहल माणिक जगताप-कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी उदघाटक म्हणून त्या बोलत होत्या.
याप्रसंगी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सि.दौ.सकपाळ, प्रभाकर म्हामुणकर, महेंद्र पाटेकर, संजय मेहता, सुमन कुंभार, शैलेश सलागरे, आशिष आगाशे, संस्थेचे सदस्य अजय सलागरे, रामदास सकपाळ, सतीश गोळे, अमर सलागरे, ज्ञानेश्वर सकपाळ, माजी मुख्याध्यापक अजित जंगम, रविकांत सकपाळ, हिंदूराव माळी, खरात, मोरे तसेच बबन पवार, बाळकृष्ण चव्हाण, नारायण साने, संतोष कदम व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पार्टे यांनी केले. याप्रसंगी शाळा समितीचे सदस्य अजय सलागरे यांनी मनोगत व्यक्त करताना, यंदा सर्वच विद्यार्थ्यांना समान फि आकारली असली तरी पुढील वर्षीपासून कापडेतील श्रीवरदायिनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी मार्गदर्शन केंद्रात कमी फी आकारणी केली जाईल,असा मानस असल्याचे सांगितले.
यावेळी खजिनदार प्रभाकर म्हामुणकर यांनी, कोरोना प्रतिबंध आणि माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर काहीकाळ रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक उपक्रम फारसे गतिमान झाले नसताना आता नानासाहेब जगताप यांच्या कल्पकतेतून या उपक्रमांनी वेग आणि दिशा घेतल्याने आगामी काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात संस्था आणि आपण स्वत: विशेष लक्ष देऊ, अशी ग्वाही दिली.
रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सि.दौ.सकपाळ यांनी शंकरराव सावंत यांच्यानंतर माणिकराव जगताप यांनी संस्थेच्या कामाकडे लक्ष कसे द्यायचे याचे मार्गदर्शन केले. अण्णासाहेब सावंत हे स्वत: मार्गदर्शक राहिले तर आता नानासाहेब जगताप यांनी या संस्थेत लक्ष घालून संस्थेचे नांव मोठे करण्याचे ठरविल्याबद्दल धन्यवाद दिले.
याप्रसंगी कार्यवाह महेंद्र पाटेकर, संस्थेचे विश्वस्त संजय मेहता, माजी मुख्याध्यापक अजित जंगम तसेच सीइटी मार्गदर्शक आशिष आगाशे यांची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली. यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनीदेखील सीईटी मार्गदर्शन शिबिर उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानणारी मनोगतं व्यक्त केली.