| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल एसटी स्टँड परिसरात चारचाकी कार मध्ये बसले असताना एका व्यक्तीने 8 लाख 40 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात 15 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विचुंबे येथील कृष्णा रामा ठाकूर 13 डिसेंबर रोजी पत्नीसह अलिबाग येथे नातेवाईकांचे लग्न असल्याने जाताना पत्नीचे दागिने सोबत घेऊन त्यांनी ते कपड्याच्या बॅगमध्ये ठेवले होते. ते पनवेल बस स्टॅन्ड येथे आले. यावेळी ते स्टॅन्डसमोर अलिबाग येथे जाणाऱ्या खासगी गाडीकडे आले. यावेळी पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कार चालकाने अलिबाग येथे जाणार असल्याचे सांगितले. आणि ते त्या गाडीत बसले. मात्र, प्रवासी नसल्याने उशीर होईल, त्यामुळे बॅग डिकीत ठेवा, असे चालकाने सांगितले. त्यांनी बॅगा डिकीत ठेवल्या आणि कारच्या सीटवर बसले. यावेळी मागच्या सीटवर एक जोडपे बसले होते. ते देखील अलिबागच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबतची महिला कार्ले खिंड येथे उतरली. त्यानंतर ठाकूर आणि त्यांची पत्नी अलिबाग येथे उतरून रिक्षा पकडून राहत्या घरी चिंचोटी येथे पोहोचले. घरी पोहोचल्यावर बॅगेमध्ये ठेवलेले दागिने पाहिले असता दागिने सापडून आले नाहीत. कारमध्ये बसल्यानंतर कोणीतरी दागिने चोरले, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.







