| पेण | वार्ताहर |
जिते मतदारसंघावर लाल बावटा फडकविणारच, असा निर्धार माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद मतदारसंघ जितेमधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत साई मंदिर, तरणखोप येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जि.प.च्या अर्थ व बांधकाम सभापती अॅड. निलीमा पाटील, सदस्य डी.बी. पाटील, पंचायत समिती उपसभापती सुचिता पाटील, तालुका चिटणीस संजय डंगर व लाल ब्रिगेड तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषद जिते मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी धैर्यशील पाटील यांनी, जिल्हा परिषद मतदारसंघ जितेमधील आपापसातील कार्यकर्त्यांचे मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. कोणाशी युती करावी किंवा नाही, तसेच मित्र मैत्री करायला पुढे आला तर विचार करू, अन्यथा या मतदारसंघावर लाल बावटा फडकविल्याशिवाय शेकापचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही, असा विश्वास व निर्धार बैठकीत विभागातील कार्यकत्यांनी केला. जिते मतदार संघाचे विद्यमान जि.प. सदस्य डी.बी. पाटील यांचे कार्य पाहता त्यांच्यासमोर कोणताही उमेदवार आला तरी त्याला पराभवाची चव चाखायलाच लागेल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.