जेएनपीएला मिळाली एमएसईडीसीएलची फ्रँचायझी

| उरण | वार्ताहर |

जेएनपीएला एमएसईडीसीएलची वीज वितरण फ्रँचायझी मिळाली आहे. वीज वितरण फ्रँचायझीचा पहिला टप्पा 21 डिसेंबर 2022 रोजी कार्यान्वित करण्यात आला. याचबरोबर जेएनपीए टाऊनशिप येथे स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम सुद्धा सुरू करण्यात आली. वीज वितरण फ्रँचायझीचे उद्घाटन जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, आणि उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेएनपीएचे सर्व विभागाध्यक्ष आणि जेएनपीएमधील सर्व टर्मिनल ऑपरेटरचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

जेएनपीएला प्राप्त झालेल्या एमएसईडीसीएलच्या वीज वितरण फ्रँचायझीचे महत्त्व अधोरेखित करताना जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले एमएसईडीसीएलसोबत सामंजस्य करार करून वीज वितरण फ्रँचायझी प्राप्त करणारे जेएनपीए पहिले मेजर पोर्ट ठरले आहे. आमच्यासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे कारण यामुळे जेएनपीए डीएफ क्षेत्रातील वीज ग्राहकांना हरित उर्जा स्त्रोतांकडून वीज पुरवठ्याचा लाभ घेता येईल.

केंद्रीय बंदरे जहाज वाहतूक व जलमार्ग मंत्रालयाच्या मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030 उपक्रमांतर्गत जेएनपीए टाउनशिप येथे जीएसएम आरएफ आधारित व रिमोटने नियंत्रित होणारी स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम कार्यान्वित केली आहे. हा आमचा एक पथदर्शी प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.

जेएनपीएने महावितरणच्या आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिकल नेटवर्क सुधारणेचे काम केले असून कनेक्शन पॉईंट्सवर स्मार्ट मीटरिंग स्थापित केले आहेत. यामध्ये बीओटी ऑपरेटर आणि जेएनपीए डीएफ क्षेत्रातील इतर एचटी ग्राहकांचा समावेश आहे ते आता महावितरणचे थेट ग्राहक बनले आहेत. तसेच, स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम प्रकल्पाचे कार्य ऊर्जा कार्यक्षम असून बंदराच्या इतर भागात सुद्धा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांळे शाश्‍वत विकासासाठी जेएनपीएची वचनबद्धता अधोरेखित होते.

Exit mobile version