जेएनपीटी-सेझमुळे बंदर औद्योगिकीकरणास चालना

जेएनपीटी | वार्ताहर |
भारतातील पहिल्या जेएनपीटी-सेझ मुळे बंदर आधारित औद्योगिकीकरणास चालना मिळाल्याचा दावा जेएनपीटी प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. जेएनपीटी ने आपल्या विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) नऊ यशस्वी निविदाकारांना आशय पत्र हस्तांतरीत करून एसईझेडच्या विकासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जेएनपीटीचे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, भा.रा.से. यांनी यशस्वी निविदाकारांना आशय पत्रे हस्तांतरीत केली, यावेळी जेएनपीटीचे सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. तसेच, जेएनपीटी-सेझ मध्ये नुकतेच आपले ऑपरेशन सुरु केलेल्या सिमोसिस इंटरनेशनल आणि सर्वेश्‍वर लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडला ही यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. जेएनपीटी-सेझ मध्ये कार्यरत झालेल्या युनिट्सची संख्या आता सहा झाली आहे.

जेएनपीटी-सेझमध्ये उद्योगांसाठी भूखंड वाटप भू-व्यवस्थापनाच्या मार्गदर्शक धोरणानुसार ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेद्वारे केले जाते. एनआयसीच्या सेंट्रल पब्लिक प्रॉक्यूरमेंट पोर्टल (सीपीपीपी) वर सक्षम अधिकार्‍यांच्या मंजुरीने नुकतीच ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. निविदा समितीच्या शिफारशी व सक्षम अधिकार्याच्या मंजुरीनुसार जेएनपीटी-सेझमधील नऊ निविदाधारक : सिनलाइन इंडिया लिमिटेड, डार्विन प्लॅटफॉर्म लॉजिस्टिक लिमिटेड, डार्विन प्लॅटफॉर्म शिपिंग लिमिटेड, दौंड शुगर पीव्हीटी लिमिटेड, एनव्हॉपॅप प्रायव्हेट लिमिटेड (पेपर प्लस टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड) आयजी इंटरनेशनल प्रायव्हेट लिमिटेड, महाराजा मर्चेंडाइज, एमईआयआर कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लि., आणि एसआरएस फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या प्रक्रियेमध्ये यशस्वी ठरले.

जेएनपीटीने नवी मुंबई येथे स्वत:च्या मालकीच्या 277.38 हेक्टर क्षेत्रामध्ये बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) विकसित केले आहे. बंदर, नौकानयन व जलमार्ग मंत्रालयाच्या सागरमाला उपक्रमांतर्गत बंदर-आधारित औद्योगीकरणास सक्षम करून निर्यातीला चालना देणे हे या बंदर आधारित बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्राचे (जेएनपीटी-सेझ) उद्दीष्ट आहे. एसईझेडमधील कंपन्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जेएनपीटी कोणतीही कसर सोडत नाही.

Exit mobile version