| अलिबाग | प्रतिनिधी |
पेझारीच्या भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत. या भूमीतून स्फूर्ती घेऊन वेगळ्या तऱ्हेने काम करायचे आहे. प्रतिगामी शक्ती वाढत असेल तर खारेपाट खपवून घेणार नाही. सत्ता असो, अथवा नसो; परंतु, निष्ठावंतांची फळी निर्माण करून आगामी काळात जिल्ह्यात विजय खेचून आणण्याचे काम प्रत्येकाला करायचे आहे. आजचा मेळावा हा उद्याला कलाटणी देणारा आहे. त्यामुळे उद्याची पहाट ही आपलीच असणार, असा विश्वास शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच, पक्ष बदलणाऱ्यांना उभे करायचे नाही. त्यांना निवडणुकीचे तिकीटही द्यायचे नाही. सध्या देशासह राज्याची परिस्थिती भयावह आहे. पीक विमा बंद आहे. लाडकी बहीण लाडकी राहिली नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्न समोर ठेवून लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा रविवारी (दि.18) सायंकाळी पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळ पटांगणात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना जयंत पाटील बोलत होते.

यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, माजी आ. बाळाराम पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, ॲड. गौतम पाटील, नारायण पाटील, काशिनाथ पाटील, राजेंद्र पाटील, अस्लम राऊत, विजय गिदी, नीता गिदी, अलिबाग तालुका शेकाप चिटणीस अनिल पाटील, जिल्ह्यातील चिटणीस मंडळाचे, तालुका चिटणीस मंडळाचे तसेच वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती, मच्छीमार सहकारी सोसायटीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य अशा सर्वच क्षेत्रातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, एका सामान्य कुटूंबातील शेतकऱ्यांचा मुलगा काय करू शकतो, हे नारायण नागू पाटील यांनी त्यावेळी आपल्या आंदोलनातून व लढ्यातून दाखवून दिले आहे. या भूमीला एक वेगळा इतिहास आहे. त्यांच्या लढ्याची प्रेरणा घेऊनच पेझारीमध्ये पक्षाचा मेळावा घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी नारायण नागू पाटील यांनी लढा दिला. हा लढा देशातील एक ऐतिहासिक लढा ठरला. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ॲड. दत्ता पाटील, प्रभाकर पाटील या दोन बंधूनी आपल्या पक्षाची ताकत राज्यात व देशात दाखवून दिली. एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. शेतकरी कामगार पक्षाला सोडून जाणे काही नवीन नाही. यापुर्वीदेखील अनेकजण पक्षाला सोडून गेले आहेत. परंतु, पक्ष कधीच संपला नाही. वेगळ्या उमेदीने कार्यकर्त्यांनी काम करून पुन्हा पक्षाला बळ दिले आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांचा विचार घेऊन आपण काम करीत आहोत. दबलेल्या वर्गाला, पिडीत व्यक्तीला पुढे नेण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. विशिष्ट समाजाची मक्तेदारी पूसून काढून त्यांनी बहूजनांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे एक वेगळे नाते आहे.

गौतम पाटील यांच्या रुपाने नवीन पिढी तयार झाली आहे. ज्यांना तयार केले. अनेक पदे दिली, ते निघून गेले. मात्र, एक वेगळ्या चिडीने आणि उमेदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागून आगामी काळात काम करायचे आहे. उद्याच्या निवडणूकीत आपलाच लाल बावटा फडकणार आहे, असा विश्वास आहे. तरुणांचा जनआघाडीमध्ये समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत वेगळ्या तऱ्हेची भूमिका घेऊन काम करायचे आहे. कामगारांनी रक्त सांडून कायदे केले. तेच कायदे पूसण्याचे काम हे सरकार करीत आहे. मोर्चे काढणे, आंदोलन करण्याचा अधिकारही नसणार आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या लढ्यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे. जिल्ह्यात चौथी मुंबई येत आहे. भूमीपुत्रांना न्याय मिळावा, यासाठी शेकाप शेतकरी, भूमीपुत्रांच्या पाठीशी कायम राहिल, असा विश्वास शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
शेतकर कामगार पक्षाच्या मेळाव्यात ज्येष्ठ, तरुण कार्यकर्त्यांसह महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. ग्रामीण व शहरी भागातील हजारो कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. हातात लाल बावटा घेऊन, ‘शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कार्यकर्त्यांना मिळाली नवी उमेद
शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी दुपारी अडीच वाजल्यापासून कार्यकर्ते पेझारीमध्ये येऊ लागले. बोलता बोलता गर्दी वाढली. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यात सुरुवात केली. त्यानंतर सर्वांनी उभे राहून जयंत पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. फुलांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान शेकाप सरचिटणीस जयंत पाटील तसेच अन्य नेते मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांनी एक वेगळी नवी उमेद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

पदाधिकारी निवड माहिती पुस्तकाचे अनावरण
शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्हा पक्ष पक्ष संघटना आणि विविध जन आघाड्यांचा पदाधिकारी निवड मेळावा पेझारी येथे आयोजित करण्यात आला. या निमित्त पदाधिकारी निवड माहिती पुस्तकाचे अनावरण शेकाप राज्य खजिनदार अतूल म्हात्रे यांच्या हस्ते आणि शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या पुस्तिकेमध्ये वेगवेगळ्या जन आघाड्यांच्या पदाधिकारी निवडीबाबतची माहिती उपलब्ध आहे.