शेकापच्या मेळाव्यात सामील व्हा: चित्रलेखा पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

लढाऊ पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाकडे पाहिले जाते. संपूर्ण महाराष्ट्रसह देशातील प्रत्येक घटक शेतकरी कामगार पक्षाकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहात आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, कष्टकरी व वंचित घटकासाठी लढणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शेकापची प्रतिमा राज्यासह देशात चांगली आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन खालापूरमध्ये होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. युवकांसह महिला व इतर सर्व कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सामील व्हावे, असे आवाहन शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात सोमवारी (दि.27) बैठक पार पडली. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी शेकाप नेत्या तथा रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते प्रशांत नाईक, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, सहचिटणीस नरेश म्हात्रे, माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, शेतकरी आघाडीचे तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, नगरसेवक अनिल चोपडा, सुरेश खोत, निलेश खोत, वृषाली ठोसर, अजय झुंजारराव, ॲड. सचिन जोशी, ॲड. विजय पेढवी, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

1 / 9



याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रायगड जिल्ह्यात तालुका स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्धापन दिन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणारा व एक वेगळा उत्साह निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळे हा दिवस सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

शेकापची ताकद दाखविण्याची हीच वेळ : सुरेश खैरे
खालापूरमधील महामार्गालगत भव्य अशा मैदानात शेकापचा वर्धापन दिन होणार आहे. त्यानिमित्ताने पोलादपूरपासून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बैठका घेण्यात आल्या. या बैठकांच्यादरम्यान कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी कामगार पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. सत्तेची लालसा कधीही घेतली नाही. भूमीपुत्र, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचा आवाज बनण्याचे काम पक्षाने केले. शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, वंचित घटक ताठ मानेने उभा आहे. स्मार्ट मीटरच्याविरोधातही शेतकरी कामगार पक्षाने पहिली आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर दिल्ली येथील विद्यार्थ्यांवर लाठीहल्ल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत आंदोलन अलिबागमध्ये केले आहे. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारला होता. शेकापची ताकद दाखविण्याची हीच वेळ आहे. हेच संघटन, हीच आक्रमकता जिवंत ठेवून मोठ्या ताकदीने वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी व्हा, असे शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी केले.
हजारो कार्यकर्ते सहभागी होणार : सुरेश घरत
शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन म्हणजे सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा दिवस आहे. या मेळाव्यातून विचारांचे एक वेगळे बळ घेऊन पुन्हा कार्यकर्त्यांना कामाला लागायचे आहे. वर्धापन दिनाला जाण्यासाठी अलिबाग तालुक्यातून तयारी झाली आहे. अलिबाग नगरपरिषदेचे गटनेते प्रशांत नाईक यांनी मोलाचे योगदान दिले आहे. या सोहळ्यामध्ये पाच हजार कार्यकर्ते सहभागी होतील, असा विश्वास तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी व्यक्त केला.
खालापूरच्या मेळाव्यात सामील व्हा : प्रदीप नाईक
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलादपूरपासून कर्जत, मुरूडपर्यंत बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमधून शेकापच्या नेत्या सुप्रिया पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना मिळाले आहे. दिल्लीतील जंतरमंतरमधील विद्यार्थ्यांना शेकापने पाठिंबा दिला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील या स्वतः दिल्लीला गेल्या. तेथील विद्यार्थ्यांना भेटल्या. अखेर विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले. त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांना स्फूर्ती देणारा आहे. कोणतेही पाठबळ नसताना, इच्छाशक्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी विजय मिळविला आहे. या आंदोलनातून प्रेरणा घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे. पक्षाला अधिक बळकट करण्याबरोबच कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा असणार आहे, असे शेकाप कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक यांनी सांगितले.
Exit mobile version