ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांचे निधन

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील अनेकविध क्षेत्रात कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण दा. जाधव यांचे गुरुवारी (दि.17) सकाळी राहत्या घरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. पोलादपूर तालुक्यात ऐन गणेशोत्सवात झालेल्या या दुःखद घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

पोलादपूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवळे हायस्कूलमध्ये काही वर्षे नोकरी केल्यानंतर सहकार क्षेत्रातील दूध उत्पादक संघ, शेतकरी बाजार, जिजामाता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्था, नवयुग विद्यापीठ, महाड पोलादपूर तालुका पत्रकार संघ या संस्था व संघटनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांशी संलग्न राहिले.

याचदरम्यान, दैनिक कुलाबा शिवतेज वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक म्हणून अरुण जाधव यांनी 15 वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता केली. कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी लिहिलेले रपेट हे चौफेर स्तंभलेखन तसेच अग्रलेख रायगड जिल्ह्यात विशेष गाजले. पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या संशोधन कार्याप्रती अरुण जाधव यांच्या लेखणीतून विशेष आपुलकी व अभिमान व्यक्त होत असे.

पोलादपूर शहरातील स्मशानभूमीत तालुक्यातील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरुण जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा एनडीटीव्ही मिडिया पर्सन राहुल जाधव व इंजिनिअर प्रणाम, मुली निवेदिता, शिल्पा आणि रुपाली तसेच जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Exit mobile version