मृत्यूच्या महामार्गावर टोलची लुट
| पेण | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाच्या नावाखाली जनतेची अक्षरशः लूट सुरू असून, अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली करून सरकार आणि प्रशासनाने कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असा संतप्त आरोप करत रायगड प्रेस क्लबने खारपाडा टोल नाक्यावर जोरदार आंदोलन छेडले होते.
रस्ता खड्ड्यांनी भरलेला, सर्विस रोड अधांतरी, गटारांची कामे रखडलेली आणि जीवघेणे अपघात सुरू असताना टोल कसला घेताय? असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. टोल नाक्यावर घोषणांचा पाऊस पडत असताना प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात पत्रकार सरचिटणीस शशिकांत मोरे यांनी टोलविरोधात शेरोशायरी आणि पोवाडा सादर करत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. “जनतेला सुविधा नाहीत, पण वसुली मात्र जोमात”, अशी टीका त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी टोलमाफीची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पनवेल कार्यालयातील अधिकारी इंगवले यांना निवेदन दिले. यावेळी इंगवले यांनी महामार्गावरील रखडलेली कामे आणि टोलमाफीचा विषय केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, “आश्वासनांचे गाजर नको, पूर्ण महामार्ग हवा”, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडली.
या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे सचिव अनिल भोळे, जिल्हा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, भारत रंजणकर, उपाध्यक्ष संजय मोहिते, मोहन जाधव, प्रशांत शेडगे संतोष ठाकूर, हरीश बेकावडे, विजय पाटील, चैतन्य पाटील, नंदू जांभुळकर, नंदा म्हात्रे, समीर म्हात्रे, अशोक मोकल यांच्यासह विविध तालुक्यांतील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.







