। रसायनी । वार्ताहर ।
पत्रकार दिनाचे औचित्य साधून रोहा येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हा अध्यक्ष राकेश खराडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत रोहा तालुक्यातील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कोकण कार्याध्यक्ष शैलेश पालकर, रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे, खालापूर उपाध्यक्ष अर्जुन कदम, पनवेल तालुकाध्यक्ष सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत रोहा तालुका अध्यक्ष म्हणून किरण मोरे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सदेश गायकर, खजिनदारपदी दिनेश मोरे, तर सचिव म्हणून सुरेश पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून अनंता म्हसकर, विश्वनाथ कोलते, काशिनाथ बामुगडे, संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. सुधागड तालुक्यातील मंगेश भाई यादव आणि प्रशांत हिगणे यांनीही या बैठकीस उपस्थिती दर्शवली.
यावेळी रोहा तालुका सल्लागारपदी समीर बामुगडे यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शैलेश पालकर यांनी भूषवले. मार्गदर्शन करताना त्यांनी पत्रकारिता करताना तटस्थता आणि सचोटी कशी असावी यावर प्रकाश टाकला. त्यांनी अनेक किस्से सांगत पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव आणि नैतिकता यावर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले.