। अलिबाग । प्रतिनिधी ।
दि. 26 जानेवारी रोजी भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनानंतर भारताचे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तसेच प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित इंडोनेशियाचे राष्ट्रपती माननीय प्रबोवो सुबियांतो यांच्या उपस्थितीत ’जयती जय मम भारतम’ या संकल्पनेवर आधारीत भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सादर झालेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जे. एस. एम. कॉलेजच्या श्रेया अधिकारी, अथर्व भगत, नेत्रा जोशी, सार्थक शेळके, प्रणव टावरी, हिमानी रिसबूड, श्रुती नाईक या विद्यार्थ्यांनी लावणी, कोळी नृत्य, वारी, महाराष्ट्रातील इतर काही आदिवासी नृत्य या नृत्य प्रकारातील आपली नृत्यकला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. जे. एस. एम. कॉलेजसाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
अथर्ववेद परंपरा कलामंचचे लक्ष्मण पडवळ यांच्यासह दिल्ली येथे जवळजवळ एक महिना सराव शिबिरात सामील झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी आपली नृत्यकला सादर करण्याची संधी या विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. 5000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सादर केलेल्या या नृत्याविष्काराची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील घेतली जाणार आहे.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अॅड. गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष मा. डॉ. साक्षी पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांच्या शूभहस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार आज दि. 29 जानेवारी रोजी महाविद्यालयात करण्यात आला. रायगड (दक्षिण) जिल्हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. जयेश म्हात्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. श्वेता पाटील यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.