रोजगार, प्रदूषण, आरोग्य विषयांवर जेएसडब्ल्यूची जनसुनावणी गाजली

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

जेएसडब्ल्यूच्या प्रदुषणामुळे आरोग्य बिघडत आहे. वैद्यकिय सेवा उपलब्ध होत नाही. फक्त 250 जणांना रोजगार या प्रकल्पात देणार अशा विविध मुद्यांवर जेएसडब्ल्यूची जनसुनावणी गाजली. प्रकल्पालाविरोध नसून जेएसडब्ल्यूच्या प्रदुषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब विरोधकांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केल्याचे दिसून आले. त्यामुळे या सुनावणीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

पेण तालुक्यातील वडखळ-डोलवी येथील तिसऱ्या टप्प्यातील जेएसडब्लू प्रकल्प आणि धरमतर पोर्ट यांच्या विस्तारीकरणासाठी पर्यावरण पुरक जनसुनावणी धरमतर जेट्टीनजीक शुक्रवारी (दि.22) दुपारी घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास सुरुवात झाली. जेएसडब्लू कंपनीच्या प्रदुषणाचा त्रास प्रचंड होत आहे. येता- जाताना खुप त्रास होतो. दुषित वातावरणामुळे नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. मात्र, इतक्या वर्षात कणभरदेखील प्रदुषण कमी झाले नाही. प्रदुषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतु, त्यानी त्याकडे लक्ष दिले नसल्याचे चित्र आजही आहे. हे शासनाला दिसत नाही, का असा सवाल उपस्थित करण्यात आला. खोदकाम शास्त्रशुध्द पध्दतीने न करता नियम धाब्यावर बसवून काम केले जात आहे. त्याचा परिणाम मासेमारी करणाऱ्यांवर होत आहे. मासळी व शेतीवर त्याचे परिणाम होऊ लागले आहेत. जेट्टीच्या विस्तारासाठी फक्त 250 जणांना रोजगार दिला जाणार आहे. मात्र, या भागात हजारो तरुण बेकार आहेत. त्यांचा रोजगाराचा प्रश्न कंपनी सोडविल का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, येथील प्रदुषण, सीआरझेडचे उल्लंघन करून होणारी कांदळवन कत्तल याबाबत प्रशासन व शासन काय भुमिका घेणार या विषयांवर ही चर्चा गाजली.

जेएसडब्ल्यू प्रकल्पातील प्रदुषणामुळे अनेक आजार होऊ लागले आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. प्रकल्पाला विरोध नाही, मात्र होणारे प्रदुषण रोखण्यावर भर देणे गरजेचे आहे. खारबंदिस्तीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडविण्यावर भर देणे गरजेचे आहे.

आटोपती घेतली जनसुनावणी
जेएसडब्लूच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाबाबत पर्यावरण पुरक जनसुनावण घेण्यात आली. या सुनावणीमध्ये प्रदुषण, रोजगार व आरोग्य या विषयांवर मोठी चर्चा झाली. अनेकांनी आपले मत व्यक्त केले. परंतु, बैठकीचे अध्यक्ष, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी विरोधकांचे म्हणणे पुर्ण ऐकून न घेता ही सुनावणी आटोपती घेतली. अनेकांनी या सुनावणी बाबत नाराजी व्यक्त केली. तर काहींनीही सुनावणी बेकायदेशीर असल्याचे ही सांगितले.
शेतकरी संघर्ष समितीच्या हरकतीवर दृष्टीक्षेप
हवेची गुणवत्ता दर्शविणारा डिजीटल फलक अजूनपर्यंत दर्शनी भागात लावला नाही.तो लावण्यात यावा. गेल्या अनेक वर्षापासून दुर्गंधीयुक्त वायुचा त्रास होत आहे. शरीरावर दुष्परिणाम होण्याची भिती निर्माण झाली आहे. जेएसडब्ल्यूच्या अस्थापनेच्या वाढत्या विस्तारीकरणामुळे लोहयुक्त कण हवेत मिसळत आहेत. प्रदुषण थांबविण्यासाठी उपायोजना केली जात नाही. विस्तारीकरणामुळे धरमतर खाडी व तिला जोडणाऱ्या उप खाड्या अधिक प्रदुषित झाल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जमीनीवर, खाडीतील मासळीवर तसेच सभोवताली असणाऱ्या इकोसिस्टीमवर होत आहे. याचे होणारे परिणाम मानवी शरीरावर होत आहे. त्याबाबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून सखोल चौकशी व्हावी, अशा अनेक विषयांवर पेझारी- शहापूर विभाग शेतकरी संघर्ष समितीने हरकती नोंदविल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील जेट्टीची उभारणी सीआरझेड एक बाधित क्षेत्रात येत आहे. सीआरझेड नोटीफिकेशन 2019 प्रमाणे व वन संरक्षण कायदा अधिनियम, 1986 प्रमाणे ही जेट्टी उभारणीच्या जागेत अस्तित्वात असलेल्या हजारो कांदळवनची कत्तल होणार आहे. उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जेएसडब्लू अस्थापना काय उपाययोजना करणार आहे. नाहीतर वरील कायद्याचे उल्लंघन होणार आहे.

अनिल पाटील
शेकाप जिल्हा चिटणीस मंडळ सद
स्य

जेएसडब्लूच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाबाबत जनसुनावणी झाली. याबाबत काहींनी यापुर्वी हरकती नोंदविल्या आहेत. आज झालेल्या जनसुनावणीमध्ये प्रत्येकाचे मत ऐकण्यात आले. याचा अहवाल शासनाला पाठविला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

संदेश शिर्के
निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड

Exit mobile version