| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत दिवाणी कोर्टातील ‘सर्वात जुना दावा’अशी ख्याती असलेला दिवाणी दावा नं.38/1991 वाळकु खारीक वगैरे विरुद्ध बाळू खारीक वगैरे हा कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जमिनीबाबतचा भावकीतील वाटपाचा दावा अखेर 35 वर्षांनंतर तडजोडीने मिटला. या दाव्याच्या कामी वादी तर्फे ॲड. विवेक पेठे तर प्रतिवादी तर्फे ॲड.संदीप बागडे व ॲड.अक्षय पेमारे यांनी कामकाज पाहिले.
वर्षानुवर्षांची दोन पिढ्यांची एकमेकांबद्दल मनात द्वेषभावना असल्याने वादी प्रतिवादी हे तडजोडीपर्यंत कधी आले नव्हते. मात्र, या दाव्याच्या कामी मयत प्रतिवादीचे वारस श्रीमती शकुंतला बाळू खारीक व नारायण बाळू खारीक यांच्या वतीने ॲड. संदीप बागडे हजर झाल्यानंतर ॲड. संदीप बागडे यांनी या दाव्याच्या सुनावणीच्या अंतरिम युक्तिवादानंतर मा. न्यायालयाला विनंती केली की, ‘वादी, प्रतिवादी हे एकाच कुटुंबातील असून वादी, प्रतिवादी आणि मी एकाच गावातील रहिवासी आहोत. या दाव्यात आजपावेतो तीन पिढ्या समाविष्ट झाल्या आहेत. या दाव्यामुळे वादी प्रतिवादी गेली अनेक वर्षे एकमेकांशी बोलत नाहीत. तसेच या दाव्यात तडजोड न झाल्यास या दाव्याच्या निकालानंतर अंतिम निर्णयाने व्यथित पक्षकार वरिष्ठ न्यायालयात जातील. व या दाव्याच्या प्रवास जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा होऊन अंतिम निर्णय होण्यास अजून 15 वर्षे नक्कीच जातील.
अशावेळी या दाव्याचा अंतिम निर्णय होण्यास जर 50 वर्षे लागत असतील तर इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर या दाव्यातील पक्षकारांना खरा न्याय मिळेल का? आणि त्यामुळे ”आजोबांनी दाखल केलेल्या दाव्याचा निकाल नातवाने घ्यायचा” हा न्याय व्यवस्थेला लागलेला दोष कधीच पुसला जाणार नाही. त्यामुळे माननीय न्यायालयाला विनंती आहे की हे प्रकरण तडजोडीने मिटण्यासाठी प्रयत्न व्हावेत.” आणि त्यानुसार मा. न्यायालयाने ॲड. बागडे यांना या दाव्याच्या तडजोडीबाबत विशेष प्रयत्न कराण्यास सांगितले. ॲड. बागडे यांनी केलेल्या प्रयत्नांना वादी दामू खारीक वगैरे, प्रतिवादी शकुंतला खारीक वगैरे व वादींचे वकील ॲड. विवेक पेठे यांनी सहकार्य केल्यामुळे अखेर हा दावा 35 वर्षांनी तडजोडीने मिटला व वादी प्रतिवादींना 35 वर्षांनंतर खरा न्याय मिळाला. या तडजोडीच्या निर्णयाने व 35 वर्षानंतर या दाव्याची सुनावणी थांबल्याने दोन्ही पक्षकार समाधान व्यक्त करीत आहेत.
गेली 35 वर्षे आम्ही न्यायापासून वंचित होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर 2023 रोजी आम्हाला कोर्टाचे समन्स आल्यानंतर आम्ही आमच्या गावातील वकील संदीप बागडे यांच्याकडे गेलो. त्यांनी आमच्या दाव्याची कागदपत्रे पाहूनच सांगितले की या दाव्यात तडजोड होऊ शकते आणि आपल्याला न्यायही मिळू शकतो. त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला 35 वर्षा नंतर न्याय मिळाला.
–नारायण खारीक
पक्षकार
35 वर्षे चाललेल्या या दाव्याचेकामी तडजोड व्हावी अशी माझी इच्छा व तळमळ होती. कारण या दाव्याच्या निर्णयाने व्यथित पक्षकार अपिलात जातील व पुन्हा या दाव्याच्या प्रवास जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सुरू होऊन या दाव्यातील पक्षकारांची आणखी 10- 15 वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत जातील हे उघड होते. त्यामुळे या दाव्याच्या कामी दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड होणे अत्यंत गरजेचे होते. न्याय व्यवस्थेवरील केसेसचा ताण लक्षात घेता पक्षकार आणि वकिलांनी तडजोड या पर्यायाचा वापर अधिकतेने करायला हवा. यामुळे न्याय योग्य आणि लवकर मिळू शकतो.
–ॲड.संदीप बागडे







