| सुनील ठाकूर | उरण |
सर्व वृक्षांमध्ये मी अश्वस्त म्हणजे पिंपळ आहे. या वृक्षाच्या शेंड्यात ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि बुंध्यात म्हणजे मुळात महेश या तिन्ही देवांचा निवास असतो. अशा प्रकारे ब्रह्मा-विष्णू- महेश हे तिन्ही देव पिंपळ वृक्षात पहावयास मिळतात. शिवाय, पिंपळाचा विस्तार फारच मोठा असतो, त्यामुळे तो सुखद छाया देतो. त्याची पाने, मुळे व साल यांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. अनेक पशुंना सुखद छाया व पक्षांना आसरा देतो. पिंपळाची नित्यनेम भक्ती करून त्याला पाणी आणि प्रदक्षिणा घातल्यास मनोरथ पूर्ण होतात. शिवमंदिर शेजारी पिंपळ हा अत्यंत दुर्मिळ योगायोग उरण तालुक्यातील पंचक्रोशीत असलेले कळंबुसरे येथेच पहावयास मिळते. हे मंदिर डोंगराच्या सान्निध्यात निसर्गरम्य अशा ठिकाणी असून, समोर तलाव असल्याने अधिकच आकर्षक दिसते.
आज अस्तित्वात असलेल्या मंदिरात कोणत्याही ठिकाणी काळभैरव पाहावयास मिळत नाही, ती मूर्ती फक्त या शिवालयात दृष्टीस पडते. हा काळभैरवरुपी महादेव या कळंबुसरे गावाचे अस्मानी आणि सुलतानी संकटापासून रक्षण करीत आहे. मंदिराभोवतीचा परिसर हा हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे. मंदिराच्या पूर्वेकडे विशाल तलाव, तर पश्चिमेकडून दक्षिणेकडे पसरलेल्या विशाल पर्वत रांगा आणि त्यांच्या पूर्वेकडील भात खासरे अशा विविध प्रकारच्या वृक्षराजीमुळे या मंदिराची शोभा अधिकच वृद्धिंगत करीत आहे.
राजा रवि वर्माने 15व्या शतकाच्या उत्तरार्धात या ठिकाणी कळंबुसरे शहराची स्थापना केली. त्यानंतर सुमारे 200 वर्षे हे शिवालय याच ठिकाणी एकटेच होते. 17 व्या शतकाच्या अखेरीस येथे साधे देवालय उभारले. पुढे 19साव्या व्या शतकाच्या माध्यमेच्या आसपास पुन्हा पूर्व सुरींनी दगड विटांचे मातीने बांधकाम करून दरवाजा देवालय उभारून पहिला जीर्णोद्धार केला आणि त्याचवेळी मैदानातील तुळशी वृंदावन बांधले. पुढे विसाव्या शतकाच्या मध्यानंतर सन 1967-68 साली गावकर्यांनी शिवालयाचा दुसरा जीर्णोद्धार केला आणि त्याला आणि आत्ता तब्बल 38 वर्षांनंतर म्हणजे सन 2005 साली आधुनिक पद्धतीचे अतिशय सुंदर असे सुमारे 25 लाख रुपये खर्च करुन या गावातील सुरेश राऊत यांनी तिसरा जीर्णोद्धार केला.
सन 1927-28मध्ये गावात कॉलराची साथ आली. पटापटा माणसे मरत होती. त्यावेळी आजच्यासारखे डॉक्टर व दवाखान्यांची व्यवस्था नव्हती झाडपाल्याचे औषध खात असत व देवावर भरवसा ठेवून लोक जीवन जगत होते. त्यावेळी खोपटे गावातील सत्पुरुष परमहंस गोपाळ काकांनी या गावात भेट दिली. गावातील लोकांनी त्यांना सांगितले की, या महादेवाच्या तुम्ही उत्सव करीत जा, सर्व काही ठीक होईल आणि खरोखरच तीन ते चार दिवसातच गाव रोगमुक्त झाला. गावकर्यांनी त्यावेळी गोपाळकाकांना महादेवाच्या उत्सव करण्याचे वचन दिले होते तेव्हापासून अखंडपणे येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्ती भावाने पार पडत आहे.
असे हे कळंबुसरेश्वर खरोखरच साक्षात्कारी, शिवभक्तांच्या हाकेला धावणारे, मनोरथ पूर्ण करणारे आहे. त्यामुळेच या मंदिरात शिवरात्रीच्या दिवशी व श्रावणी सोमवारी भक्तांची दर्शनासाठी रीग लागलेली असते.