Water Scarcity: कामोठेकरांचा पाण्यासाठी आक्रोश

दहा वर्षांच्या आंदोलनांनंतरही प्रश्न जैसे थे!

| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |

कामोठे शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर गेल्या दहा वर्षांत विविध सामाजिक संघटना, नागरिक मंच तसेच राजकीय पक्षांनी अनेक आंदोलने, मोर्चे आणि बैठका घेतल्या. मात्र अद्यापही शहरवासीयांच्या पदरी निराशाच पडली असून पाणी प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालल्याची खंत कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांनी व्यक्त केली आहे.

कामोठे शहरातील नागरिकांसाठी पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आणि ज्वलंत विषय बनला असून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन आठ वर्षे उलटली तरीही पाणी प्रश्नावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे अढाव यांनी म्हटले आहे.


पाणी प्रश्नावर चर्चा झाली की, अमृत योजना आणि न्हावा-शेवा स्टेज-2 योजनेचा दाखला देत भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी आश्वसने दिली जातात. मात्र, ही योजना गेल्या सहा वर्षांपासून रखडलेली असून तिच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारण्यास कोणीही पुढे येत नसल्याची टीका करण्यात आली आहे.
जोपर्यंत न्हावा-शेवा योजना पूर्णत्वास येत नाही, तोपर्यंत वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त जलसाठा मंजूर करून घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मात्र, यासाठी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा होत नसल्याचाही आरोप करण्यात आला.
पनवेल व नवी मुंबईतील आमदार, पनवेल आणि नवी मुंबई महानगरपालिकांचे आयुक्त तसेच सिडको चे व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करून कामोठे शहरासाठी तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त जलसाठा मंजूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून पनवेल महानगरपालिकाचे स्वतंत्र धरण उभारणे अत्यंत गरजेचे असून त्याबाबत महापालिकेकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत, याची माहिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणीही मंगेश अढाव यांनी केली आहे.

Exit mobile version