। मुंबई । प्रतिनिधी ।
कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक कविता केली आणि ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली. या प्रकरणात कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि कुणाल कामराने कविता जिथे शूट केली त्या हॉटेलची तोडफोड केली. कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांनी गुन्हा देखील दाखल केला. त्यामुळे कुणाल कामरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला. दरम्यान, आता कुणाल कामराने शुक्रवारी (दि. 28) मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे.
खार पोलिसांनी कुणाल कामराला नोटीसही पाठवली आहे. मात्र, शिंदेंवरील कवितेनंतर सतत जीवे मारण्याच्या धमक्या कुणाल कामराला मिळत आहेत. आता कुणाल कामराने थेट मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात अर्ज केला असून या अर्जावर कोर्टात सुनावणी केली जाणार आहे. मुंबईत आल्यास आपल्या जीवाला धोका असल्याचेही कुणाल कामरा याने म्हटले आहे.
कुणाल कामराने म्हटले की, मी विल्लुपुरम तामिळनाडूचा राहणारा आहे. मी जर मुंबईत गेलो तर मला मुंबई पोलिसांकडून अटक केली जाईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे कुणाल कामराच्या याचिकेवर कोर्टाकडून काय निर्णय दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.