ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी विजय; यजमानांच्या घरी पराभूत करण्याची पहिलीच वेळ
| सिडनी | वृत्तसंस्था |
बांगलादेशने पहिल्या कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करताना यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केले आहे. हसन महमूद आणि मेहिदी हसन मिराझ यांच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने पहिली कसोटी जिंकली. बांगलादेशचा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी विजय ठरला असून, ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करण्याची ही बांगलादेशची पहिलीच वेळ ठरली. यापूर्वी 2017 मध्ये बांगलादेशने मिरपूर कसोटी 20 धावांनी जिंकली होती आणि आता 9 वर्षांनी बांगलादेशने ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी विजय मिळवला आहे.
या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या हसम महमूद (6-55) याच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शरणागती पत्करली. स्टीव्हन स्मिथच्या 71 धावांमुंळे कांगारून 198 धावांपर्यंत पोहोचू शकले. महमूदला तस्किन अहमद (2-55) व इबादत होसैन (2-39) यांनी साथ दिली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशने पहिल्या डावात 426 धावा कुटल्या आणि मजबूत आघाडी घेतली. तंझीद अहमदचे (101) शतक अन् कर्णधार नजमूल होसैन शांतो (84) व मेहिदी हसन मिराझ (65) यांच्या अर्धशतकांनी संघाला मजबूत स्थितीत आणले. तसेच, मोमिनूल हस (49) व मुश्फीकर रहिम (36) यांनी देखील चांगला खेळ केला. यावेळी ऑस्ट्रोलीयाचा गोलंदाज जोश हेझलवूडने 6 बळी घेतले.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून दमदार खेळी खेळली जाईल, असे वाटत होते; परंतु, त्यांचा संघ 284 धावांवर गडगडला. यावेळी बांगलादेशचे गोलंदाज मेहिदी मिराझने 5 आणि महमूदने 3 बळी घेतले. दरम्यान, कॅमेरून ग्रीनच्या (104) शतकाने ऑस्ट्रेलियाची लाज राखली. स्मिथने पुन्हा उपयुक्त 44 धावा केल्या, तर ॲलेक्स केरीने 30 धावांचे योगदान दिले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया फक्त 57 धावांचे माफक लक्ष्य उभे करू शकले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्याच षटकात हेझलवूडने झटका दिला. पहिल्या डावातील शतकवीर तंझीद भोपळ्यावर त्रिफळाचीत झाला; परंतु, शादमान इस्लाम (25) व मोमिनूल हक (30) यांनी संघाचा विजय निश्चित केला. यावेळी बांगलादेशने 9 गडी राखून हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
बांगलादेशच्या या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या (77.78) पराभवाने भारतीय संघाचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे गणित बदलले आहे. परंतु, ते अजूनही 9 सामन्यांत 7 विजय मिळवून अव्वल स्थानी कायम आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिका 75 टक्के व न्यूझीलंड 72.22 टक्क्यांसह अंतिम फेरीच्या शर्यतीत पुढे आहेत. बांगलेदशने (66.67) हा विजय मिळवला खरा, परंतु ते तरीही चौथ्या स्थानावरच राहणार आहेत.
