पहिल्याच दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रातच आटोपला
| कानपूर | वृत्तसंस्था |
भारत-बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (दि.27) कानपूरमध्ये सुरू झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला.
सामन्यावर सकाळपासूनच पावसाचे सावट होते. त्यामुळे दिवसाचा खेळ दुसऱ्या सत्रातच आटोपावा लागला. दिवसभरात एकूण 35 षटकांचा खेळ झाला, ज्यात बांगलादेशने 107/3 धावा केल्या. भारताकडून आकाश दीपने 2 बळी घेतले. तर रविचंद्रन अश्विनने एक बळी घेतला. कानपूर कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी रात्री देखील पाऊस झाला. शुक्रवारी ओल्या मैदानामुळे नाणेफेकीला एक तास उशीर झाला. सामनाही सकाळी साडेदहा वाजता सुरू झाला. पहिने सेशन संपल्यानंतर कव्हर्स मैदानावर आले आणि त्यानंतर दुपारी 1.25 वाजता दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. मात्र, या सत्रात फारसा खेळ झाला नाही आणि केवळ 9 षटके टाकली गेली. पहिल्या सेशनमध्ये 26 षटकांचा खेळ झाला होता.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती पाहून नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पहिल्या काही षटकांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना बळी मिळाला नाही. यानंतर रोहितने डावाच्या नवव्या षटकात चेंडू आकाश दीपकडे सोपवला. त्याने येताच संघाला यश मिळवून दिले. आकाशदीपने सलामीवीर झाकीर हसनला शून्यावर बाद केले. तर त्याचा साथीदार शादमान इस्लामही 24 धावा करून बाद झाला. यानंतर दुसऱ्या सत्रात अश्विनने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला (31) एलबीडब्ल्यू आऊट केले. खेळ संपेपर्यंत मोमिनुल हक 40 आणि मुशफिकर रहीम 6 धावांवर नाबाद होते.