| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात सोनसाखळी चोरी करणारे लुटारु पुन्हा सक्रिय झाले असून या लुटारुंनी एका दिवसांमध्ये तीन महिलांसह चार जणांच्या अंगावरील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किंमतीचे दागिने लुटून पलायन केले आहे. या लुटारु विरोधात अनुक्रमे कळंबोली, कामोठे आणि सीबीडी पोलिसांनी जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
सोनसाखळी चोरीच्या या घटनांमुळे महिला वर्गात या लुटारुंची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. कळंबोलीतील रोडपाली तलावाच्या गेटजवळ पहिली घटना घडली. कळंबोली सेक्टर-6 मध्ये राहणारी संयोगिता शुक्ला (34) ही आपल्या मैत्रिणीसह बहिणीच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी शाळेत पायी चालत जात होती. यावेळी रोडपाली तलावाच्या गेटजवळ पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुनी संयोगिता हिच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोन्याची चैन खेचुन पलायन केले.
त्यानंतर कामोठेतील मालवण तडका हॉटेल जवळ दुसरी घटना घडली. सदर घटनेत सेक्टर-36 मध्ये राहणारी आदिती सिंग (38) हि विवाहिता आपली मुलगी व मैत्रिणीसह स्कुटीवरुन आपल्या घरी जात होती. यावेळी मालवण तडका हॉटेल जवळ काळ्या रंगाच्या केटीएम दुचाकीवरुन आलेल्या दोघा लुटारुने आदिती सिंग हिच्या गळ्यातील 90 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले. त्याच दिवशी सायन पनवेल मार्गावर केटीएम दुचाकीवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी सीबीडी बेलापूर येथे अवघ्या 15 मिनिटांमध्ये दोघांचे दागिने व इतर ऐवज लुटून पलायन केले. पहिल्या घटनेत केटीएम दुचाकीवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी रिक्षामधून पनवेल येथून वाशीच्या दिशेने जात असलेल्या लक्ष्मी चव्हाण या महिलेची 40 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, मोबाईल फोन, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, एटीएम कार्ड असलेली पर्स खेचुन मुंबईच्या दिशेने पलायन केले.
त्यानंतर काहीवेळात पुन्हा पनवेल लेनवर आलेल्या या लुटारुंनी सीबीडी येथील उड्डाणपुलाच्या उताराजवळ मोटारसायकलवरुन जाणार्या आदित्य मोरे (23) या तरुणाच्या गळ्यातीळ 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन पनवेलच्या दिशेने पलायन केले. एका दिवसांमध्ये तीन महिलांसह चार जणांच्या अंगावरील सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. याविरोधात कळंबोली, कामोठे आणि सीबीडी पोलिसांनी जबरी चोरीचे गुन्हे दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांकडून या लुटारूंच्या शोध घेण्यात येत असला तरी, चैन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. या घटनांचा अधिक तपास कळंबोली पोलीस करीत आहेत