करंजाडे ग्रामपंचायतीची अतिक्रमणावर कारवाई; नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील वडघर पूल ते काॅलेज फाटापर्यंत वाढलेल्या अतिक्रमणावर कारवाई करत करंजाडे ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडी फोडली आहे. सरपंच मंगेश शेलार यांनी याबाबत पुढाकार घेऊन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा दिला आहे.
पनवेलहून उरणकडे जाताना गाढी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. त्या पुलापासून काॅलेज फाटापर्यंत हातगाडी आणि फेरीवाल्यांनी रस्ता अतिक्रमित केला होता. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना येता-जाता नाहक त्रास सहन करावा लागत होता. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीदेखील होत होती. नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायत करंजाडे यांना तक्रारी केल्या होत्या. यावर सरपंच मंगेश शेलार यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आठ कर्मचारी यांनी एक जेसीबीसह अतिक्रमणावर कारवाई केली. त्यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतला. याबाबत नागरिकांकडून सरपंच मंगेश शेलार आणि ग्रामपंचायतीचे आभार मानले जात आहेत.
