। पनवेल । प्रतिनिधी ।
सिडकोच्या गलथान कारभारामुळे करंजाडेवासियांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही निकाली न निघाल्याने त्याच्या विरोधात करंजाडे पिपल्स फाऊंडेशनच्यावतीने मोठ्या संख्येने येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन सिडकोचा निषेध केला. सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्यासह मोठ्या प्रमाणात माता-भगिनी व येथील नागरिक सकाळी जेएनपीटी हायवे रास्ता रोको करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते व त्यांनी धडक मोर्चा काढून सिडकोच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. गेल्या अनेक महिन्यापासून या परिसरात पाणी प्रश्न बिकट होत चालला असून त्यामुळे अनेकांनी आपली राहते घरे विकून दुसरीकडे राहण्यास गेले आहेत. सिडकोने या भागाचा विकास करताना पाणी प्रश्नाचे नियोजन करणे गरजेचे होते. परंतु ते न करता येथे फक्त इमारती उभारल्या गेल्या आहेत व येथील रहिवाशांना पाणी विकतचे घ्यावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला व सिडकोने त्वरित पाणी प्रश्न निकाली न काढल्यास आगामी अधिवेशनात करंजाडेवासियांचा मोर्चा त्यांच्यावर काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. पाण्यापासून नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.त्यानुसार करंजाडे वसाहतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जेएनपीटी रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले. मात्र पोलिसांनी सेक्टर 6 ते करंजाडे पोलीस चौकी इथपर्यंतच हा रास्ता रोको अडवला. करंजाडे वसाहत सिडकोने वसवली आहे. मात्र मूलभूत सुविधा पुरवण्यात सिडको अपयशी ठरलेली दिसून येत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. पाणीटंचाईमुळे करंजाडेकर त्रस्त झाले आहेत कोणत्याही परिस्थितीत पाणी मिळाल्याशिवाय शांत बसायचे नाही असा निर्धार नागरिकांनी केला होता. यासाठी सिडकोला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. पुकारण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावेळी सिडकोचे कनिष्ठ अधिकारी आंदोलन कर्त्याना भेटण्यासाठी आले मात्र वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय आम्ही जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलन करताना घेतली त्यामुळे कार्यकारी अभियंता प्रणित मूल यांना त्या ठिकाणी यावे लागले आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्या समजावून घ्याव्या लागल्या.
एमजेपीची जुनी जीर्ण झालेली जलवाहिनी बंद करून जेएनपीटी हायवेलगत तयार करण्यात आलेली नवी जलवाहिनीद्वारे करंजाडे शहरासाठी 20 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात यावे. सेक्टर- 5/6 हिलसाईड सोसायट्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सेक्टर-6 मध्ये स्वतंत्र एमबीआर (पाण्याची टाकी) बांधण्यात यावे. शटडाऊनच्या काळात शहरातील सोसायट्यांना सिडको प्रशासनाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा. करंजाडे शहराला हेटवणे धरणाचे पाणी आरक्षित करून करंजाडे पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावे. शटडाऊन काळात आगाऊ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व शटडाऊन नंतर सोसायट्यांना गढूळ पाणीपुरवठा केला जातो याची काळजी घ्यावी. करंजाडे पाणीप्रश्न पूर्णतः मार्गी लागेपर्यंत नव्या इमारतींना सीसी व ओसीची मान्यता बंद करण्यात यावी. करंजाडे पाणी समस्येवर स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात यावी. करंजाडे पाणीपुरवठा अधिकारी राहुल सरोदे यांच्याविरोधात रहिवाशांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांच्या जागी नवीन अधिकार्यांची नेमणूक करण्यात यावी. या मागण्या येथील रहिवाश्यांमार्फत करण्यात आल्या होत्या. यातील बहुतांशी मागण्या बाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले तसेच पाणी प्रश्न लवकरच सोडवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा हा विजय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे आणि रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले.