पॉवर लिफ्टिंगमध्ये अमृताला रौप्य
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू गावातील अमृता जानेश्वर भगत हिने रुमानिया येथे झालेल्या जागतिक पावर लिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना रौप्यपदकाची कमाई केली आहे. रायगडच्या कन्येने आपल्या कामगिरीने देशासह जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालत आपला तिरंगा डौलाने फडकविला आहे. अमृताने क्लासिक गटात यश मिळविले असून, तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
रुमानिया देशातील नापोका सिटीमध्ये जागतिक पावर लिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने जागतिक युवा पॉवर लिफ्टिंग स्पधा गुरुवार, दि. 24 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेतील 47 किलो गटातील एक्वीप गटात भारताचे प्रतिनिधित्व करणारी पावर लिफ्टर अमृता भगत हिने पहिल्याच दिवशी कमाल केली. अमृताने जगातील मात्तब्बर अशा 40 देशांतील खेळाडूंमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. तिने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 120 किलो वजन उचलून इतिहास रचला आहे. भारताचा तिरंगा पहिल्याच दिवशी जागतिक युवा पावर लिफ्टिंग स्पर्धेत अमृता भगत हिने फडकावला असून, अमृता याच स्पर्धेत आणखी एका गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 3 सप्टेंबरपर्यंत रुमानियामध्ये चालणार आहे.