अध्यक्षपदी प्रल्हाद पाटील, उपाध्यक्षपदी मनोहर बैले
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मच्छिमार संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी अलिबागमध्ये पार पडली. या निवडणुकीत पेणमधील प्रल्हाद पाटील यांची अध्यक्षपदी, तर मुरुडमधील मनोहर बैले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्हा मच्छिमार संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (25 ऑगस्ट) रोजी अलिबागमध्ये झाली. पेण तालुक्यातील दादर येथील प्रल्हाद दिनेश पाटील यांनी अध्यक्षपदासाठी, तर मुरुडमधील मनोहर महादेव बैले यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. या दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक निलेश शिंदे यांनी घोषित केले.
या निवडीनंतर शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील यांची नवनिर्वाचित अध्यक्ष प्रल्हाद पाटील व उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी शेकाप भवनमध्ये जाऊन भेट घेतली. आ. जयंत पाटील यांनी या नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.