कर्नाळा अभयारण्याची पर्यटकांना भूरळ

वर्षभरात 60 हजार जणांची अभयारण्याला भेट

| पनवेल | वार्ताहर |

कर्नाळा अभयारण्यात विविध पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचा नेहमी या परिसरात वावर आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावरील उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे गेल्या वर्षभरात 60 हजार जणांनी अभयारण्याला भेट दिली आहे. त्यामध्ये कर्नाळा किल्ल्यावर पर्यटकांचा ओघ वाढल्याचे चित्र आहे. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा उंचावर असल्याने येथील हवा ही नेहमी थंड असते.

निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय, रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतव्दाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सूर्यपक्षी, हरियल यांसारखे सुमारे 134 प्रजातींचे स्थानिक; तर 38 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आहेत. अनेक पर्यटक व गिर्यारोहक या ठिकाणी येत होते. मुंबई, ठाणे आणि इतर ठिकाणाहून अनेक जण सुट्टी किंवा वेळ मिळेल, तेव्हा कर्नाळ्यात येत असतात. विशेष म्हणजे, कर्नाळा किल्ला हा पक्षीप्रेमींबरोबर गिर्यारोहकांचे आकर्षण आहे.

किल्ल्यावरील बंदीने परिणाम
मध्यंतरी कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. हा मार्ग धोकादायक होता. त्याचबरोबर पायऱ्यासुद्धा झिजल्या होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणताही अपघात घडू नये, या अनुषंगाने कर्नाळा किल्ला पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही महिन्यांपासून हा प्रवेश सुरू करण्यात आला आहे. किल्ला बंद असल्याने पर्यटकांच्या संख्येवर काहीसा परिणाम दिसून आला.
Exit mobile version