सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठी एमआईडीसीचा पुढाकार
| पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तळोजा औद्योगिक वसाहती मधील सांडपाणी निस्सारण वाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कामा करता अंदाजे 75 कोटी रुपये खर्च करण्यात असून, या करता निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 1970 साली स्थापित तळोजा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी निस्सारण वाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत.
या वाहिन्यांमधून अनेकदा कारखान्यातील रासायनिक सांडपाणी रस्त्यावर येत असून, औद्योगिक वसाहती मधून वाहणार्या कसाडी नदी पात्रता देखील हे सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषित होऊन नदी पात्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या विरोधात पनवेल परिसरातील अनेक सामाजिक संस्था आवाज उचलत आहेत. स्थानिक शेकाप नेते माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या विरोधात राष्ट्रीय हरित लावादात याचिका दाखल केली आहे. म्हात्रे यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान लावादाने प्रदूषणा बाबत औद्योगिक विकास महामंडळावर ताशेरे ओढत नदीत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश होते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने तळोजा औद्योगिक वसाहती मधील सांडपाणी निस्सारण वाहन्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जवळपास 75 कोटी 44 लाख 11 हजार 975 रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
सांड पाण्यावर प्रक्रिया
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणार्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कसाडी नदी किनारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. या प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी वाघीवली येथील खाडी पात्रता सोडण्यासाठी कसाडी नदी पात्रातून जवळपास 10 किलोमीटर लांबीच्या वाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. या वाहिन्यांची लांबी देखील वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, 3.30 किमी लांबी वाढवण्यात येणार आहे.