आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांविरोधात होणार गुन्हा दाखल
| रायगड | खास प्रतिनिधी |
विधानसभा निवडणूक काळात समाजमाध्यमांवर कुठलीही पोस्ट करताना अथवा प्रतिक्रिया देताना तसेच पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना प्रत्येकाने सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार असून, अशी पोस्ट करणार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, टिकटॉक, बिग टीव्ही यासारख्या माध्यमातून खोटी माहिती देणे, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने माहिती पोस्ट करणे इत्यादी प्रकार केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. निवडणूक काळात समाजमाध्यमांचा चुकीचा वापर करू नये, असे आवाहन श्री. घार्गे यांनी केले आहे.
या काळात तसेच भविष्यातदेखील सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर, फोटो पोस्ट करू नयेत. देशाची एकता-सार्वभौमत्व आदींचे नुकसान करणारा, कोणत्याही संप्रदाय विरोधातला मजकूर, अफवा पसरविणारा, जीवे मारण्याची धमकी देणारा, अश्लील कंटेंट, चाइल्ड पोर्नोग्राफी आदी पोस्ट करणारा आणि ती पोस्ट शेअर करणारा अशा दोघांनाही दोषी ठरविले जाते. यापैकी काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवास, सायबर क्राइमसाठी तीन वर्षे ते आजीवन कारावास तसेच एक लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो, असेही घार्गे यांनी स्पष्ट केले आहे.