मुख्याधिकारी रश्मी चव्हाण
| खोपोली | प्रतिनिधी |
गेल्या आठ दिवसांपासून खालापुरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, नगराध्यक्षा रोशनी मोडवे यांनी नुकतीच नगरपंचायत परिसराची पाहणी केली. दरम्यान, पूरपरिस्थिती नसल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगत अतिवृष्टीत आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालापूर नगरपंचायत सज्ज असल्याची माहिती दिली.
खालापूर शहराच्या बाजूनेच पातळगंगा नदी वाहत असल्यामुळे नागरिकांना सतकर्तेचा इशारा दिला जातो. आदिवासी वाड्या-वस्त्या मोठ्या असल्यामुळे अतिवृष्टीत घरांचे मोठे नुकसान होत असते. मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, नगराध्यक्षा रोशनी मोडवे, गटनेते किशोर पवार यांनी शहरातील पूरपरिस्थितीची पाहणी केली.
लेंडी पुलामुळे पाणाच्या निचरा होण्यासाठी मदत होत असल्यामुळे स्मशानभूमीत पाणी घुसले नाही. महड गावातील गणपती मंदिरासमोरील पार्किंगमध्ये पाणी साठले आहे. मात्र, त्याचा नागरीकरणावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांनी सांगत आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खालापूर नगरपंचायतीची आपत्कालीन टीम सज्ज ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.