खारघर-कळंबोली मार्गाला झळाळी

| पनवेल । वार्ताहर ।

शीव-पनवेल महामार्गावरील खारघर ते कळंबोली मार्गावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे महामार्गावर पसरलेल्या अंधारामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. यासाठीच सार्वजनिक बांधकाम विभागाने पनवेल महापालिकेला आठ कोटींचा निधी दिला असून नवीन वर्षात हा महामार्ग प्रकाशमय होणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. निधीअभावी महामार्गावरील पथदिवे त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा देखभाल-दुरुस्त करणे सार्वजनिक बांधकाम विभागाला दुरापास्त झाले होते. अशातच महामार्गावर पसरलेल्या अंधारामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्याने प्रवासी वर्गात नाराजी होती. या सर्व गोष्टींचा विचार करून सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे देखभाल व दुरुस्तीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावेत, अशा प्रकारचे आदेश सरकारकडून निर्गमित करण्यात आले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करून पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्थांना विनंती करण्यात आली होती; मात्र पनवेल महापालिकेने सीबीडी भारती विद्यापीठ ते कळंबोली जंक्शन यादरम्यानचे पथदिवे देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, असे पत्र पालिकेने दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने पालिकेला आठ कोटींचा निधी हस्तांतर केला असून बंद पथदिव्यांच्या कामाला वेग आला आहे.

अंधारामुळे प्रवास धोक्याचा
खारघरचे प्रवेशद्वार असलेल्या हिरानंदानी उड्डाणपुलाखालून खारघर वसाहतीत प्रवेश करताना आणि बाहेर पडताना पुलाखालून रोज शेकडो वाहने जे-जा करतात; मात्र पुलाखाली लावण्यात आलेले चाळीस विद्युत दिवे सात वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वे अथवा हिरानंदानी बस थांब्यावर उतरून वसाहतीत प्रवेश करणार्‍यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी दिवे सुरू करण्यात यावेत, यासाठी खारघर वाहतूक विभाग, सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला होता.

Exit mobile version