खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जोरात

| उरण | वार्ताहर |

खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरू आहे. रेल्वेच्यावतीने या 14 किलोमीटर मार्गावर अखंड 260 मीटर लांबीचे रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम शनिवारी उरण स्थानकातून करण्यात आले.

नवी मुंबईतील नेरूळ ते उरण रेल्वे मार्ग सध्या उलवे नोड मधील खारकोपर पर्यंत सुरू आहे. तर या मार्गावरील खारकोपर ते उरण मार्गाचे रखडलेले काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. हे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करून ही सेवा जानेवारी 2023 पासून कार्यान्वित करण्याचे आदेश दिल्लीवरून आले आहेत. त्यामुळे जासई येथील शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यासाठी बंद केलेले काम पोलीस बंदोबस्तात पुन्हा सुरू केले आहे. या रेल्वेचे जुने ट्रॅक बदलून त्याजागी अखंड 260 मीटर लांबीचे ट्रॅक टाकण्याचे काम सुरू आहे.

धोकादायत प्रवास
नेरूळ ते उरण रेल्वे मार्गाचे काम सुरू असून बोकडविरा ते द्रोणागिरी नोडला जोडणार्‍या मार्गावर रेल्वे रूळ टाकण्यात आले आहेत.असे असतानाही हे रूळ ओलांडून वाहनचालकांकडून धोकादायक प्रवास केला जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उरण रेल्वे स्थानक ते गव्हाण दरम्यान रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्याची सुरुवात उरण मधून करण्यात आली आहे. यामध्ये पूर्वी बोकडविरा ते उरणला जोडणारा ओएनजीसी असा रस्ता होता. त्यामुळे बोकडविरा रस्त्याला रेल्वेचे फाटक होते. मालगाडी आल्यानंतर हे फाटक बंद केले जात होते. मात्र नव्याने सुरू होणार्‍या उरण ते नेरूळ लोकलसाठी सिडकोने पर्याय म्हणून बोकडविरा ते नवीन शेवा असा रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे. हा रेल्वे उड्डाणपूल पार न करता जवळचा मार्ग म्हणून अनेक दुचाकी स्वार व रिक्षा चालक धोकादायक रेल्वे मार्ग ओलांडून प्रवास करत आहेत. नव्याने याच मार्गावर नवीन रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आले असतानाही या मार्गावरून प्रवास केला जात आहे.

Exit mobile version