मृत्यूनंतर तीन महिन्यानंतरही कारवाई नाहीच
| कर्जत | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षीय खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्टरोगाची चुकीची औषधे दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. या घटनेला तीन महिने उलटले असून अद्यापही आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे खुशबूच्या कुटूंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधिक्षिका यांच्यावर शासनाकडून कारवाई झाली आहे. पण चुकीची औषधे देणाऱ्या आरोग्य खात्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याने शासन खुशबूच्या पालकांना न्याय देणार का? असा प्रश्न तीन महिन्यांनी पुन्हा उपस्थित झाला आहे.
पेण तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षाची आदिवासी मुलगी वरवणे येथील शासकीय आश्रशाळेत शिकत होती. या आश्रमशाळेत 16 डिसेंबर रोजी झालेल्या कुष्टरोग निर्मूलन कुसुम या कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या हिवताव कुष्ठरोग निर्मूलन पथक यांनी चौथीमध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिला कुष्ठरोगी ठरवले होते. त्यानंतर कुष्ठरोगावरील गोळ्या घेतल्यावर खुशबूच्या अंगावर फोडी आल्या आणि नंतर ताप तसेच अंग सुजू लागल्याने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेथे उपचार सुरु करण्याआधी कुष्ठरोग निर्मूलन करण्याच्या गोळ्या बंद करण्यात आल्या. त्यानंतर उपचार घेत असताना खुशबू ठाकरे हिचा 22 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता.
नऊ वर्षाच्या खुशबू हिला त्यापूर्वी कोणताही आजार नव्हता. असे असताना खुशबूला कुष्ठरोगी ठरवून तिला गोळ्या देण्यात आल्या. चुकीची निदान केल्याने खुशबूचा बळी गेला. या प्रकरणी पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, कर्जत येथील आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते नंदा म्हात्रे यांनी आवाज उठवला होता. त्याचवेळी या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका आमदारांकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.
अर्थसंकल्प अधिवेशन सुरु असतानाच पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित गंगाराम पवार आणि आश्रमशाळेच्या महिला अधीक्षिका सुवर्णा वरगने यांना कामात कसूर केल्याबद्दल निलंबित केले. आदिवासी विकास विभागाने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे खुशबू ठाकरे हीचा मृत्यू शासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या प्रकरणात सुदृढ मुलीला कुष्ठरोगी ठरवून चुकीचे निदान करून तशी औषधे देणाऱ्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर आजपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा अहवाल कधी येणार?
याप्रकरणी पेण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दखल झाल्यावर खुशबुचा मृत्यू चुकीचे औषधे दिल्याने झाला का? यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या औषधांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पेण पोलीसांनी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना दिले होते. मात्र मागील अडीच महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी अहवाल पेण पोलिसांना देऊ शकले नाहीत. पेण ते अलिबाग हे अंतर 25 किलोमिटरचे असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना खुशबू मृत्यू प्रकरणी तिला देण्यात आलेल्या औषधांचा अहवाल देण्यास अडीच महिने लागतात, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी राजकिय दबाब?
राजकीय दबावामुळे आरोग्य विभाग आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजीव गांधी पंचायत राज संगठनच्या राष्ट्रीय महासचिव नंदा म्हात्रे यांनी केला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल हे लवकर आल्यावर या प्रकरणामुळे अनेकांचे बिंग उघडे पडणार आहे, असा दावा म्हात्रे यांनी केला आहे.