| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसते. हडबडलेल्या पाकिस्तानच्या सैन्याने आता सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय सैन्यावर गोळीबार केला. त्यामध्ये दहा भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये 10 पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊन भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर सीमेवर परिस्थिती चिघळू नये अशी इच्छा आहे. परंतु, पाकिस्तानने तणाव वाढवला तर त्याला निर्णायक उत्तर देणार असल्याचं भारताने आधीच स्पष्ट केले आहे. आताही सीमेवर पाकिस्ताने केलेल्या गोळीबाराला उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या 10 जवानांना ठार केलं आहे.
भारताने बदला घेतला
भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून पाकिस्तानात 100 किमी आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण केले. दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली.
या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या तळांवर अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं.