| पुणे | प्रतिनिधी |
सतरा लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील दोन महिलांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तमनगर परिसरात घडली, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तपास करुन गुंडासह साथीदारांना अटक केली. गुंडांच्या तावडीतून दोन महिलांची सुटका करण्यात आाली. बाबुलाल लक्ष्मण मोहोळ (वय 45, सरडे बाग, उत्तमनगर ), अमर नंदकुमार मोहिते (वय 39, रा. गणेश नगर ), प्रदीप प्रभाकर नलवडे (वय 38, रा. भूगाव)स अक्षय मारूती फड (वय 24, रा. वारजे) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. उत्तम नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोहोळ आणि साथीदारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुंड शरद मोहोळ याच्या टोळीला बाबुलाल शस्त्रे पुरवायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत एका महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने व तिच्या मैत्रिणींनी पुणे स्टेशन परिसरात स्टॉल मिळून देतो असे सांगून आरोपी बाबुलालकडून रोख रक्कम घेतली होती. मात्र, स्टॉल न मिळाल्याने बाबुलाल आणि त्याच्या साथीदारांनी कात्रज आणि वारजे परिसरातून दोन महिलांचे अपहरण करून त्यांना डांबून ठेवले होते. त्यानंतर आरोपींनी या महिलांच्या घरी फोन करून 17 लाख रुपये खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास त्यांना ठार मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेच्या मुलाने पोलिसांकडे धाव घेतली.