| वाकण | वार्ताहर |
नागोठण्याजवळील वरवठणे (ता.रोहा) आदिवासी वाडीकडे जाणार्या रस्त्यालगत खदानी कुशल्याचा माळ येथे चार गुरांची कत्तल करून गोमांस घेऊन अज्ञात इसमांनी पोबारा केला आहे. या घटनेेनंतर अज्ञात आरोपींचा शोध घण्याचे आव्हान नागोठणे पोलीसांसमोर निर्माण झाले आहे. वरवठणे येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांच्या निदर्शनास हा धक्कादायक प्रकार आला. या ठिकाणी गुरांची विष्ठा तसेच चार ठिकाणी रक्त पडलेले दिसून आले. या घटनेची माहिती किशोर म्हात्रे यांनी तात्काळ नागोठणे पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांना मिळताच त्यांनी सहाय्यक पो. उपनिरीक्षक दयानंद ठाकूर, पो.ह.प्रमोद कदम, विनोद पाटील, युवराज म्हात्रे, चंद्रकांत पाटील, गणेश भोईर, पो.ना. नितेश पाटील, पो.शि निलेश कोंडार यांच्यासह घटना स्थळी जाऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच त्या ठिकाणी पोलीसांकडून पंचनामा करण्यात आला.
या घटनेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोरभाई म्हात्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच ठिकाणी या आधीही चार वेळा अशा घटना घडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले. नागोठण्याजवळील कडसुरे व कुहीरे गावांलगत असणार्या नर्सरी मध्येही अशीच घटना घडली होती.