| रोहा | वार्ताहर |
दिवाळी सणाला सुरुवात झाली असून, दिवाळीनिमित्त कोलाड, रोहा बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या आहेत. विविध वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसत आहे. मात्र, प्रचंड महागाईमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.
एकीकडे निवडणुकीचे वारे, दुसरीकडे दिवाळीचे धामधूम यामुळे कोलाड तसेच रोहा शहरांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. बाजारामध्ये विविध प्रकारच्या पणत्या, रांगोळीचे रंग, आकर्षक कंदील मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. आकर्षक आकाश कंदिलांच्या किमती मात्र दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लायटिंगच्या माळासुद्धा झगमगाट करत आहेत. रांगोळीचे छाप, त्याचप्रमाणे सुगंधी उटणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. भाऊबीज सण अगदी जवळ आला असून, बहीण-भाऊ एकमेकांना भेटवस्तू देण्यासाठी कपड्यांची दुकाने, त्याचप्रमाणे इतर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
विविध प्रकारच्या साड्या, आकर्षक शर्ट्स, रेडिमेड कपडेसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. पावसानेसुद्धा परतीचा प्रवास केल्यामुळे बाजारपेठा गजबजल्या आहेत. मिठाईची दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसत असून, मिठाई खरेदीरांची संख्या मोठी आहे. बळीराजा मात्र आपल्या शेतीच्या कापणीमध्ये मग्न दिसत आहे. कारण, पावसाचा भरोसा नसल्यामुळे जे काही शेतात उरले आहे, ते आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करत आहे.
दिवाळी सणासाठी कोलाड रोहा बाजारपेठा विविध वस्तूंनी सजल्या
