कोंढाळकर क्रिकेट अकॅडमी लोधिवली विजयी

| पोयनाड | क्रीडा प्रतिनिधी |


झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतिचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात कोंढाळकर क्रिकेट अकॅडमी लोधिवली संघाने वीर स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी संघावर विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या कोंढाळकर क्रिकेट अकॅडमीने 40 षटकांत 4 गडी बाद 210 धावा केल्या. सलामीवीर सुयश पारंगेने 33, तर मधल्या फळीत स्वरा खेडेकर हिने संयमी फलंदाजी करत 82 चेंडूंचा सामना करत 10 चौकरांच्या सहायाने सर्वाधिक 86 धावा केल्या. तिने स्पर्धेतील लागोपाठ दुसरे अर्धशतक ठोकले आहे. मधल्या फळीत ओम सांगलेने 35 धावांचे योगदान दिले. वीर स्पोर्ट्सकडून मिहीर जंझोत व समर्थ घोलप यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

प्रत्युत्तरात वीर स्पोर्ट्स संघाने 32 षटकांमध्ये सर्व गडी अवघ्या 86 धावा केल्या. त्यामध्ये वंश कडूने 14, तर विवान मांढरेने 11 धावा केल्या. कोंढाळकर क्रिकेट अकॅडमीकडून सुयश पारंगेने 4, रिषभ ठाकूर व अथर्व माम्हूणकर यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.कोंढाळकर क्रिकेट अकॅडमी संघाने सामना 124 धावांनी जिंकला. अष्टपैलू खेळाडू सुयश पारंगेला सामनावीर, वंश कडू स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू, स्वरा खेडेकर, विवान मांडोरे, ओम सांगले इमॅर्जिंग प्लेअर, सोहम अरसुरे आणि समर्थ घोलप यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून झुंझारचे सचिव किशोर तावडे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे सदस्य राजेंद्र कोंढाळकर, प्रवीण कडू, अशोक पारंगे, मदन घरत, मोजेस नवगावकर, संकेश ढोले, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version