। रोहा । प्रतिनिधी ।
कोकणात सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण म्हणजेच गणेशोत्सव होय. या सणासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांची लगबग आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र, यंदाही कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या तिकिटांसाठी चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच सर्व तिकिटे संपली असून वेटिंग लिस्टची मर्यादा संपल्याने थेट ‘रिग्रेट’ चा संदेश दाखवला जात आहे. यामुळे चाकरमान्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी ३ ते ४ दिवस आधी गावी पोहोचता यावे, यासाठी चाकरमान्यांनी तिकिटांसाठी मोठी गर्दी केली होती. सोमवार दि.१३ जुलैपासून सुरू झालेल्या आरक्षणात ११ सप्टेंबरच्या तिकिटांसाठी सर्वाधिक चढाओढ पाहायला मिळाली. मुंबई-गोवा मार्गावरील प्रमुख गाड्यांचे बुकिंग सुरू होताच काही मिनिटांतच वेटिंग लिस्ट फुल्ल झाली. त्यामुळे प्रमुख गाड्यांचे तिकीट मिळणे अशक्य झाले आहे.
कोकणकन्या एक्सप्रेस, दादर-सावंतवाडी एक्सप्रेस, मंगळुरू एक्सप्रेस या गाड्यांचे तिकीट आयआरसीटीसी किंवा खासगी संकेतस्थळावरून काढण्याचा प्रयत्न केल्यास थेट ‘रिग्रेट’चा मेसेज येत असल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
रेल्वेने गेल्या १० जुलैपासून ८ सप्टेंबरच्या तिकिटांचे आरक्षण सुरू केले आहे. त्यामुळे गावी जाण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतील प्रमुख रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. चर्चगेट, दादर, वांद्रे, बोरिवली कुर्ला, मुलुंड आणि ठाणे या आरक्षण केंद्रांवर तिकीट मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे, घरातून ऑनलाईन तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीच्या साईटवर ‘रिग्रेट’चा सामना करावा लागत आहे.
बाप्पाच्या आगमनापूर्वीच कोकण रेल्वे हाऊसफुल्ल
