Konkan Railway: पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व, चोवीस तास वॉचमन तैनात

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

कोकणात मान्सून दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. अतिसंवेदनशील रेल्वे मार्गांवर रात्रीची गस्त वाढविण्यासह धोकादायक ठिकाणी चोवीस तास वॉचमन तैनात करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे महामंडळाच्या सुरक्षा विभागातर्फे रत्नागिरी येथे पावसाळी गस्तीविषयी सुरक्षा परिसंवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यात दरड कोसळणे, रेल्वे रुळावर माती घसरणे, पाणी साचणे किंवा अन्य नैसर्गिक अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रीच्या गस्तीला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत गस्त घालणारे कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. कोणतीही असामान्य बाब आढळल्यास तत्काळ जवळच्या स्थानकप्रमुखांना माहिती देऊन आवश्यक उपाययोजना केल्या जातात.

डायरीची देवाणघेवाण महत्त्वाची
प्रत्येक गस्ती कर्मचाऱ्याला पाच किलोमीटरपर्यंतचा मार्ग सोपविण्यात येतो. शेजारच्या विभागातील गस्ती कर्मचाऱ्यांमध्ये गस्ती डायरीची देवाणघेवाण केली जाते. ही प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास संबंधित रेल्वेमार्ग सुरक्षित असल्याचा महत्त्वाचा संकेत मिळतो. परिसंवादा दरम्यान गस्ती डायरी देवाणघेवाणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ही प्रक्रिया अडथळ्यांमुळे खंडित झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास गस्ती कर्मचाऱ्यांनी कोणती कार्यपद्धती अवलंबावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या परिसंवादाचे अध्यक्षस्थान कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी भूषविले. तर संचालक (वे अँड वर्क्स) राजीव कुमार मिश्रा यांनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 175 जण उपस्थित होते. सुरक्षा मोहिमेअंतर्गत अग्निसुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात आली. अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर कसा करावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांची तयारी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
Exit mobile version