राज ठाकरेंची भावनिक साद
| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरवस्थेला आतापर्यंतचे सर्वच राज्यकर्ते जबाबदार असून,या राज्यकर्त्यांना रस्त्यावर आणायचे असेल तर कोकणी माणसाने भावनिक न होता विकासाला प्राधान्य देणाऱ्यांना सत्तेवर बसविले पाहिजे,यासाठी कोकणी माणसा जागा हो,असे भावनिक आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी कोलाड येथे केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकण जागर यात्रा काढली आहे. या यात्रेत राज ठाकरे ,अमित ठाकरे ,शर्मिला ठाकरे सहभागी झाल्या होत्या. तर, राज ठाकरे यांनी ा कोलाड येथून कोकणी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोकणातील जमिनी विकू नका असं सांगतानाच कोकणातील जमिनींचं गणितही विषद केलं.
पदयात्रा सोपा मार्ग
सरकारला जाग आणण्यासाठी पदयात्रा आयोजित केली. पदयात्रा हा सोपा मार्ग असतो. सरकारचं धोरण आहे की पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाही तर हात सोडून जा. आज पदयात्रेतून सरकारला काही गोष्टी शांततेत सांगायच्या आहेत, असंही ते म्हणाले. शस्त्रक्रिया झाली नसती तर मीही चाललो असतो. पण आमचा अमित, पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, वसंत मोरे, राजू पाटील ही सर्व मंडळी या रस्त्यांवर चालले. काय चाळण झालीय या रस्त्याची. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की कोकणी माता भगिनींना गेली अनेकवर्षे खड्डे सहन करावे लागताहेत. तेच तेच आमदार-खासदार निवडून देतात आणि तेच तुमच्या आयुष्याचा खेळखंडोबा करतात. या रस्ते अपघतात किती लोक गेले असतील? रस्त्यावर पडलेले खड्डे भरता येता पण माणसाचं आयुष्य पुन्हा आणता येत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
मी हात जोडून कोकणी बांधवांना विनंती करतो की जमिनी विकू नका. हा रस्ता असा (अपूर्ण) ठेवण्यामागचं सर्वांत मोठं कारण अत्यंत चिरीमिरीमध्ये जमिनी विकत मिळत आहेत. अत्यंत मामुली किंमतीत जमिनी विकत घेतली जात आहेत. जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा शंभरपट किंमतीत तुमच्याच जमिनी व्यापाऱ्यांना विकल्या जाणार आहेत. पैसे ते कमवणार, आणि तुम्ही तसेच राहणार,
राज ठाकरे,मनसे अध्यक्ष
जमिनींचं गणित समजून घ्या
आपल्याकडे कुंपणच शेत खातंय. आपलेच लोक जाऊन मामुली किंमतीत जमिनी विकत घेऊन व्यापाऱ्यांना करोडो रुपयांना विकताहेत. दळवळण जेव्हा चांगलं होतं, रस्ते चांगले होतात तेव्हा आजूबाजूच्या जमिनींना काय भाव मिळतात हे गणित समजून घ्या. या जमिनी तुमच्या आहेत, त्या तशाच ठेवा. आज ना उद्या रस्ता होईल, रस्ता झाल्यावर त्याची किंमत तुम्हालाच मिळेल. या व्यापाऱ्यांच्या हाताखाली या जमिनी घालू नका. त्यांना काय रट्टे लावायचे ते आम्ही लावू, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी कोकणी बांधवांना साद घातली आहे.