कोप्रोली इलेव्हन संघ चिरनेर तिरंगा चषकाचा मानकरी

स्वर्गीय बाजीराव परदेशी यांना क्रिकेट स्पर्धेत वाहिली आदरांजली

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील मातोश्री मैदानावर काँग्रेस आय कमिटी आणि युवक काँग्रेस कमिटी चिरनेर, भोम व धाकटे भोम यांच्या वतीने, (दि.28) फेब्रुवारी ते (दि.2) मार्च या कालावधीत स्वर्गीय बाजीराव परदेशी स्मृती, चिरनेर तिरंगा चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चिरनेर तिरंगा चषक क्रिकेट स्पर्धेत स्वर्गीय बाजीराव परदेशी यांच्या कार्याचा आढावा घेऊन, त्यांना आदरांजली वाहण्यात आली. दरम्यान क्रिकेट स्पर्धेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील, डॉ.मनीष पाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, शेकापचे सुरेश पाटील तसेच अन्य मान्यवरांनी हजेरी लावून, खेळाडूंचे कौतुक केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. दरम्यान क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद कोप्रोली येथील इलेव्हन कोप्रोली क्रिकेट संघाने पटकाविले.

त्यांना तिरंगा चषक व दीड लाख रुपये असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. तर उपविजेतेपद धाकटी जुईच्या मैत्री मिलिंद स्पोर्ट्स या क्रिकेट संघाने जिंकले. त्यांना 75 हजार रुपये व तिरंगा चषक देण्यात आला. तर बेलवलीच्या जय हनुमान क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना 35 हजार रुपये रोख व तिरंगा चषक देण्यात आला. नवा पाड्याच्या प्रणित इलेव्हन, जय हनुमान क्रिकेट संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. त्यांना 35 हजार रुपये व तिरंगा चषक प्रदान करण्यात आला. याशिवाय बेलवली संघातील अजय पाटील या खेळाडूला मालिकावीराचा किताब देण्यात आला.

यावेळी त्याला बक्षीस म्हणून बाईक देण्यात आली. नवापाडा संघातील धीरज घरत या खेळाडूला बक्षीस म्हणून सायकल देण्यात आली. कोप्रोली संघातील चरण म्हात्रे या खेळाडूला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सायकल देण्यात आली. धाकटीजुई संघातील रोहित गुरुनाथ घरत या खेळाडूला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्पोर्ट्स शूज देण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक देण्यात आला.या स्पर्धेसाठी नामांकित पंच व उत्कृष्ट समालोचक यांना निमंत्रित करण्यात आले होते. क्रिकेट स्पर्धेचे हे नववे वर्ष असून, उरण तालुक्यातील चिरनेर गावातील या मानाच्या प्रकाश झोतातील क्रिकेट स्पर्धेत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट प्रेमींना अनुभवायला मिळाला. राजेंद्र भगत, अलंकार परदेशी, महेंद्र ठाकूर, सचिन घबाडी, किशोर केणी, व रवी भगत या प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर अन्य कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

Exit mobile version