। अलिबाग प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव येथील माणिक दामोदर सावंत यांचे अल्पशा आजारामुळे मंगळवारी( दि.17) सकाळी निधन झाले. निधनासमयी ते 74 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत यांचे ते वडील होते.
माणिक सावंत हे स्थापत्य अभियंता होते. त्यांच्या आजारपणावर गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान मंगळवारी (दि.17) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. नागाव येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, श्रीकांत आठवले, आक्षीचे सरपंच रश्मी पाटील, विकास पिंपळे आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. माणिक सावंत यांचे दशक्रिया विधी गुरुवारी (दि.26) व उत्तरकार्य रविवारी (दि.29) सप्टेंबरला त्यांच्या राहत्या घरी नागाव येथे होणार असल्याची माहिती सावंत कुटुंबियांनी दिली.