आजपासून नाशिक नगरीत मराठी साहित्य, भाषा आणि संस्कृतीचा उत्सव सुरू होत आहे. हे अखिल भारतीय साहित्य संमेलन मराठी भाषा संस्कृतीत विशेष असून दरवर्षी विविध मराठी भाषक प्रदेशात भरवल्या जाणार्या या उत्सवात मराठी म्हणून जे कोणी आहे आणि जिथे आहे त्याच्यासाठी ही एक महत्त्वाची घटना असते. अर्थात मराठी म्हटल्यावर जो काही लढवय्या, वादविवाद आणि नवनवे मार्ग काढण्याच्या प्रवृत्तीचा उल्लेख होतो तो इथे नाही झाला तरच नवल. साहित्य हे जीवनाचे प्रतिबिंब असते त्यामुळे मराठी साहित्य हे मराठी माणसाचे प्रतिबिंब असणे साहजिक आहे. त्यात त्याचे मतभिन्नत्व आणि वाद ही ठळक वैशिष्ट्ये प्रतिबिंबीत नाही झाली तर कसे होईल? त्यानुसार अनेक वर्षांच्या परंपरेनुसार एका संमेलनाची सांगता होताना नवीन संमेलनाची तारीख, स्थळ जाहीर होते तिथपासून सुरू होणारी वादविवादांची मालिका ते संमेलन वर्षभराच्या काळानंतर संपन्न होऊन नवीन जाहीर होईपर्यंत सुरू राहते. आणि त्यापुढच्या संमेलनापर्यंत ती पुढे चालते. या संमलेनातही वाद झाले आणि होत आहेत. स्वागतासाठीच्या निमंत्रण पत्रिकेतील नावांपासून साहित्यिक कार्यक्रमात असलेल्या नावांपर्यंत सगळे वाद झाले. स्वागतपर कार्यक्रमासाठी आयोजित गायनवादनात सहभागी कलाकारांच्या जातधर्मावरून वाद झाले. स्वागत गीतांतील व्हिडियोत वापरलेल्या प्रतिमांवरून वाद झाले आणि उद्घाटक म्हणून निवडलेले विश्वास पाटील यांच्याबाबतही वाद रंगत आहे. हा विशाल डोलारा सांभाळण्यासाठी आणि यशस्वीपणे निभावण्यासाठी हजारो लोकांची मोट बांधणे आणि त्यासाठी निधीची व्यवस्था करणे, कार्यक्रम, पाहुणे, निवास, भोजन आदी व्यवस्था करणे हे या वादापलीकडे होत असलेला मोठा कारभार असतो. मोठ्या घरात कार्य निघाल्यानंतर सर्व नातेवाईकांना, मित्रमंडळींना योग्य पद्धतीने, मानाने सामावून घेण्यासाठी जी कसरत करावी लागते, तशी इथेही असते. दूरचे मामा, रुसलेले रागावलेले काका हा जसा या कार्य जाहीर होताच व्यक्त होणार्या प्रवृत्ती असतात, तसे संमेलन कार्याचेही असते. पुन्हा मराठी साहित्य संमेलन, तेही अखिल भारतीय म्हटल्यावर सगळ्यांना त्यात सहभागी व्हायचे असते. तारखा सोयीच्या असण्यापासून जाण्या-येण्या-राहण्याच्या सोयीपर्यंत अनेक गोष्टींबाबत मते असतात. कार्यक्रम कोणते आणि कोणाचे असायला हवेत याविषयीही अनेक मते असतात आणि ती आपापल्या जागी योग्यच असतात. कोरोना साथीमुळे ज्या काही अनेक गोष्टी पुढे ढकलल्या गेल्या, त्यानुसार हे संमेलन देखील पुढे ढकलले गेले. आता ते आजपासून पुढील तीन दिवस चालेल. यात सगळ्यांनाच सहभागी व्हायला मिळते असे नाही, उपस्थित राहणेही शक्य होते असे नाही. कोणत्याही त्रुटी नसलेले संमेलन होणे हे काही शक्य नसते, सगळ्यांचेच समाधान करणे सुद्धा शक्य नसते. मात्र याकडे मराठी भाषा आणि संस्कृतीचे वहन करणार्या मराठी साहित्याचा जागर म्हणून पाहायला हवे. ही एक वाहती नदी आहे. ती वाहात राहणे महत्त्वाचे असते. त्यातून नवी वाट फुटली म्हणून ती कमकुवत होत नाही तर ही परंपरा अधिक विस्तृत आणि बलशाली होते यावर आपला विश्वास हवा. आज मराठीत एकच एक संमेलन कुठे होते? त्यात विद्रोही साहित्य संमेलन असते, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन असते, दलित साहित्य संमेलन असते, वैचारिक साहित्य संमेलन असते, आणि त्या व्यतिरिक्त विभागवार, प्रादेशिक, विषयवार राज्यभरच नव्हे तर जेथे जेथे म्हणून मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य जिवंत आहे त्या सगळ्या ठिकाणी हा जागर होत असतो. तो कोणताही असो, त्यातील आंतर्विरोध कितीही असोत, शेवटी ते मराठीला, मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला बळकट करत असतात. मराठी साहित्य संस्कृतीची परंपरा संत वाङ्मयापासून वैज्ञानिक साहित्यापर्यंत आहे आणि त्यात विस्तृत रूपात एकवाक्यता आहे. कारण संकुचित दृष्टीकोनात विरोधाभात आणि छोटी छोटी वैचारिक बेटे दिसतात. मात्र मराठी साहित्याच्या विशाल सागरात सगळ्या प्रकारच्या विचार, संस्कृतीचे सम्मीलन होत असताना त्याचे विश्वरूप दर्शन घडते. प्रत्येक अखिल भारतीय साहित्य संमेलनातून या वैश्विक रूपाचे दर्शन घडेलच असे नाही. त्यामुळे असलेल्या त्रुटींवर मात करत, विविध दृष्टीकोनांचा अंतर्भाव करत हा प्रवाह वाहत राहिला पाहिजे. तरच आपली भाषा, साहित्य आणि संस्कृती ताजी, रसरशीत आणि म्हणून जिवंत राहील.






