रशिया युक्रेनवर हल्ला करण्याची धमकी देत केवळ दबाव टाकत आहे, तो प्रत्यक्षात हल्ला करणार नाही अशी अटकळ बांधत असलेले युरोप अमेरिका आणि उर्वरीत जग गाफिल असताना युद्ध सुरू झाले आणि गोंधळ निर्माण झाला. या आक्रमणाला तोंड देण्यासाठी एकाकी पडलेल्या युक्रेनचे नेतृत्व ज्या पद्धतीने मैदानात उतरले आणि सर्व यंत्रणा कशा कार्यान्वित केल्या ते पाहता आता अनेक ठिकाणहून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे. युरोपीयन युनियन शस्त्रास्त्र देणार असून रशियाची बँकेपासून राजकीयपर्यंत विविध पातळीवर नाकेबंदी करण्यात येत आहे. यात तेथे हल्ल्यानंतर अडकलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर एक दोन विमानांतून विद्यार्थी मायदेशी आणण्यात येत असून तेथून बाहेर पडून विविध देशांच्या सीमेवर पोचलेल्या विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ले होत आहेत. रविवारी आलेल्या पहिल्या विमानात केंद्रीय वाहतूक मंत्री शिंदे यांनी जाऊन सरकारने त्यांना कसे सुरक्षित परत आणले याचा व्हिडियो बनवून आपल्या सरकारच्या निर्लज्ज अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्याचा प्रकार केला. आयटी सेल आणि नेहमीच्या सोशल मिडिया प्रचारकांकडून काही विद्यार्थी कसे न येण्याच्या निर्णयावर हटून बसले आहेत असा प्रचार करण्यात येऊ लागला होता. जेणेकरून सरकार सगळे करत आहे आणि विद्यार्थ्यांनाच यायचे नसेल तर काय करणार असा कोणत्याही नागरिकाला तेही भक्त नसलेल्यानाही पटणारा युक्तिवाद केला जात होता. परंतु अवघ्या काही तासांतच त्यांचे बिंग फुटले. खुद्द विद्यार्थ्यांचे ते कुठे अडकलेले आहेत, त्यांना कशी मारहाण होत आहे, त्यांना कसे कोणीही मदत करायला तयार नाहीत याचे अनेक व्हिडिओे प्रसारीत झाले. नुकताच कीवमध्ये अडकलेल्या मुलीचा एक व्हिडियो तर हादरवणारा आहे. त्या जेथे राहात आहेत तेथे रात्री लोक धिंगाणा घालू लागले आहेत आणि कोणीही मदतीला येत नाही, असे तिचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे दूतावासातून कोणतीही मदत मिळत नाही आणि तेथून कोणी उत्तरही देत नाही. एका मुलीने सांगितल्यानुसार त्यांचे फोनही दूतावासातील अधिकारी घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांना परक्या देशात अधिकच पोरके आणि असहाय्य वाटत आहे. भारत सरकार आता कुठे मुलांना आणण्यासाठी चार मंत्र्यांना पाठवण्याची घोषणा करत आहे. ते सुद्धा आम्ही येऊन तुमची सुटका कशी केली याचा व्हिडियो बनवण्यासाठीच असणार. जेव्हा नेतृत्व कमकुवत आणि अकार्यक्षम असते तेव्हा त्याचे परिणाम सर्वत्र दिसतात. आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी 56 इंचाची छाती असलेला लोहपुरुष आहे आणि तो विश्वगुरु आहे असा पैसा खर्च करून प्रचार करणे वेगळे असते. अशा वेळी खर्या कर्तृत्वाची कसोटी लागते. तुलना करायची झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्वसुरी डॉ. मनमोहन सिंग यांनी लिबियातील युद्धग्रस्त भागातून तब्बल 16 हजार भारतीयांना सुखरूप देशात आणले होते. हे वृत्त कोणाला फारसे माहिती नाही कारण त्याची बातमी कदाचित दूरदर्शनवरही दाखवली गेली नसेल. कारण त्यांचे नेतृत्वगुण कर्तृत्वाचे होते, केवळ बोलाची कढी आणि बोलाचा भात यावर दिवस काढणारे नव्हते. परंतु अशा कमकुवत, दिशाहीन नेत्त्वाची फळे सगळ्यांनाच भोगावी लागतात. गेली सात आठ वर्षे ती देश भोगत आहे. कारण सुमार लोक सुमार लोकांना घेऊन चालतात आणि सुमार गोष्टीच करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत देशात जसे सुमार लोक सत्तेत आले तसेच सुमार लोक त्यांनी दूतावासात भरले. योगा दिवस साजरा करणे एवढेच त्यांचे कर्तृत्व आहे. त्यांचा हा सुमारपणा युक्रेनसह संपूर्ण पूर्व युरोपातील भारतीय दूतावासात दिसून आला आहे. युक्रेन बलाढ्य रशियापुढे ज्या निर्धाराने लढत आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील नेतृत्वाचे हे अपयश या कोवळ्या तरुण वयात परदेशी अडकलेल्या मुलांना वार्यावर सोडण्याच्या बाबतीत अधिक उठून दिसले आहे. मोठ्या देशातील उच्च शिक्षण न परवडल्यामुळे अशा अधिक स्वस्त ठिकाणी मोठी स्वप्ने घेऊन गेलेल्या या मुलांना संकटकाळी तेथील दूतावास हा एकमेव आधार असतो. तोही न राहिल्याने खर्या अर्थाने या सरकारने या मुलांना पोरके करून सोडले आहे. आता तरी या विश्वगुरुने जी जनतेच्या पैशाने भ्रमंती केली, त्याची भरपाई निदान या मुलांना आणि अन्य नागरिकांना त्वरीत सुरक्षितपणे परत आणून करायला हवी.